Shekar Patil Maqheshwari Infra 1
क्राइमताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रब्रेकिंगराज्यसातारा

कराड-कोरेगाव बसमध्ये बसताना सोन्याचे दागिण्यांवर डल्ला, वारंवार घटना

आशा सेविकेचे मिनीगंठण लंपास

कराड :- कराड एसटी स्थानक चोरट्यांसाठी जणू सुरक्षित आश्रयस्थानच बनले आहे का, असा प्रश्न निर्माण करणारी आणखी एक साखळीचोरीची घटना बुधवारी घडली. बसमध्ये चढण्यासाठी झालेल्या प्रचंड गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने एका आशा सेविकेच्या गळ्यातील सुमारे १ लाख ५ हजार रुपये किमतीचे दीड तोळ्याचे सोन्याचे मिनीगंठण क्षणार्धात लंपास केले. गेल्या काही दिवसांपासून बसस्थानक परिसरात महिलांना लक्ष्य करून साखळीचोरीच्या घटना सातत्याने घडत असल्याने प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. वाठार किरोली (ता. कोरेगाव) येथील निकिता संदीप कांबळे (वय- ४३) या आशा सेविका असून बीएलओ प्रशिक्षणासाठी त्या कराड येथे आल्या होत्या. प्रशिक्षण आटोपल्यानंतर त्या मैत्रीण संगीता योपट बनावडे यांच्यासोबत दुपारी सुमारे दोनच्या सुमारास मसूर-कोरेगाव मार्गावरील एसटी बसमध्ये चढत होत्या.

यावेळी बसमध्ये मोठी गर्दी झाल्याने प्रवाशांची चढाओढ सुरू होती. याच गोंधळाचा अचूक फायदा घेत अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातील दीड तोळ्याचे सोन्याचे मिनीगंठण हिसकावून नेले. गळ्याला ओढ लागल्याचे जाणवताच त्यांनी गळ्यात हात घातला असता दागिना चोरीला गेल्याचे लक्षात आले. त्यांनी तत्काळ आरडाओरडा केला; मात्र तोपर्यंत चोरटा गर्दीत मिसळून पसार झाला होता. चोरीस गेलेल्या मिनीगंठणाची किंमत सुमारे १ लाख ५ हजार रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेजसह विविध तांत्रिक बाबींच्या आधारे तपास सुरू आहे.

कराड एसटी स्थानकात महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावण्याच्या घटना वारंवार घडत असल्याने महिला प्रवासी आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काही दिवसांपूर्वी अशाच प्रकारातील एका टोळीला कराड शहर पोलिसांनी जेरबंद केले होते. मात्र त्यानंतरही चोरीच्या घटना न थांबल्याने बसस्थानक परिसरात आणखी प्रभावी सुरक्षा व्यवस्था, गर्दीच्या वेळेत साध्या वेशातील पोलिसांची नियुक्ती आणि वाढीव गस्त राबविण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close