धक्कादायक : सातारा जिल्ह्यातील एकाच कुटुंबातील चाैघांचा शाॅक लागून जागीच मृत्यू

फलटण:- सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातून अत्यंत धक्कादायक आणि हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. खामगाव येथे बुधवारी पहाटे विजेचा शॉक लागून एकाच कुटुंबातील चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. एकमेकांचे प्राण वाचवण्याच्या प्रयत्नात संपूर्ण कुटुंब काळाच्या पडद्याआड गेल्याने खामगावसह संपूर्ण फलटण तालुक्यावर शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, खामगाव येथील एका खाजगी इंग्लिश मीडियम शाळेजवळ राहणाऱ्या शिंदे कुटुंबातील किसन पिसुरड्या शिंदे (वय-45) यांना पहाटे साडेपाच ते सहा वाजण्याच्या सुमारास घराबाहेरील विद्युत वायरमध्ये आलेल्या प्रवाहाचा शॉक लागला. त्यांना वाचवण्यासाठी गंगुबाई शिंदे (वय-40), सचिन शिंदे (वय-26) आणि आरती शिंदे (व.-24) धावले. मात्र, दुर्दैवाने तेही विद्युत प्रवाहाच्या संपर्कात आले आणि चौघांचाही जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच फलटण ग्रामीण पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. त्यानंतर चारही मृतदेह शवविच्छेदनासाठी फलटण उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.
घराबाहेरील वायरमध्ये विद्युत प्रवाह कसा आला, ही दुर्घटना नेमकी कशामुळे घडली आणि यामागे निष्काळजीपणा होता का, या सर्व बाबींचा तपास फलटण ग्रामीण पोलीस करत आहेत. एकाच कुटुंबातील चार सदस्यांचा काही क्षणांत झालेला मृत्यू ही घटना संपूर्ण सातारा जिल्ह्यासाठी हादरवून टाकणारी ठरली असून, खामगाव गावात शोककळा पसरली आहे. मृतांच्या कुटुंबीयांवर आणि नातेवाईकांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
प्राथमिक माहितीनुसार आज सकाळी ६ वाजण्याचा सुमारास बल्ब काढताना/लावताना वडिलांना (सतीश) झटका लागला त्यांना वाचविण्याच्या प्रयत्नात त्यांची पत्नी आणि २ मुले यांनाही विजेचा झटका लागला आहे.



