ताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रब्रेकिंगराजकियराज्यलोकसभा 2024विधानसभा 2024सातारा

KARAD उत्तर- दक्षिणेत गणेश मंडळांना नेते पावले आता फटाके फुटणार

विशाल वामनराव पाटील
कराड तालुका दोन मतदार संघात विभागला असून कराड उत्तर आणि कराड दक्षिण विधानसभा मतदार संघात यंदा चुरस पहायला मिळणार आहे. लोकसभेला घडलेला चमत्कार यामुळे भाजपामध्ये आत्मविश्वास दुणावला आहे. तर महाविकास आघाडीही आता बेसावध भूमिका झटकून तयारीला लागली आहे. यामुळेच गणपती बाप्पा ऐन निवडणुकीच्या तोंडावर आल्याने गणेश मंडळांना नेते पावले. आता दिवाळीतही फटाके फुटणार हे नक्की… मात्र कोणाचे हे निकालानंतर स्पष्ट होईल.

जेष्ठ नेते शरद पवार यांचा बालेकिल्ला असलेल्या सातारा लोकसभेत पहिल्यांदाच कमळ फुलवत भाजपाने महाविकास आघाडीला चांगलाच धक्का दिला. महाविकास आघाडीचे विजयाचे गणित हे कराड उत्तर आणि कराड दक्षिण या दोन मतदार संघावरच होते. आमदार बाळासाहेब पाटील यांच्या मतदार संघातून किमान 30 ते 35 हजारांहून अधिक मताधिक्य शशिकांत शिंदेंना मिळेल असा आत्मविश्वास महाविकास आघाडीत होता. परंतु, भाजपाच्या त्रिसुत्री नेत्यांनी महाविकास आघाडीचा डाव हाणून पाडत, गेल्या पंचवार्षिक निवडणुकीतील तब्बल 50 हजारांचे मताधिक्य घटवले. या खेळीमुळे आता भाजपाला कराड उत्तरेत विधानसभेला विजयाची खात्री वाटू लागल्याने तयारीला जोर लावला आहे. भाजपाने लोकसभेला केलेली खेळी पुन्हा भविष्यात विधानसभेला होवू नये, यासाठी आ. बाळासाहेब पाटील आपले पुत्र जशराज पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांना सोबत घेवून मतदार संघ पिंजून काढू लागले आहेत.

सातारा जिल्ह्यात काॅंग्रेसने कराड दक्षिण आजपर्यंत अबाधित ठेवला आहे. या ठिकाणी स्व. विलासराव पाटील- उंडाळकर यांच्यानंतर 2014 आणि 2019 मध्ये माजी मुख्यमंत्री विद्यमान आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी विजयाची घाैडदाैड सुरू ठेवली. आता तिसऱ्यांदा भाजपाचे डाॅ. अतुल भोसले आणि आ. पृथ्वीराज चव्हाण आमने-सामने येत आहेत. विधानसभेला दोन वेळा मताधिक्य भाजपाला मिळाले नसले तरी लोकसभेला छ. उदयनराजे भोसले यांना मताधिक्य देण्यात डाॅ. अतुल भोसलेंना यश मिळाले आहे. त्यामुळे आता भाजपाने ग्राऊंडवर चांगलाच जोर लावला आहे. भाजपाने पहिल्यांदाच घेतलेल्या मताधिक्याकडे काॅंग्रेसने दुर्लक्ष केले नसून तयारीला सुरूवात केली आहे.

यंदा 2024 सालात लोकसभा निवडणुकीच्या पाठोपाठ आता ऐन सणासुदीत विधानसभा लागू शकते. गणेशोत्सव आणि त्यानंतर दिवाळी- दसऱ्यात किंवा त्यानंतर आमदारकीची निवडणूक लागणार आहे. गणेशोत्सवात गणेश मंडळांना खूश करण्यासाठी नेते मंडळीनी चांगलीच वर्गणी दिल्याने गणेश मंडळांना नेते मंडळी पावली. आता आचारसंहिता कधीही लागू शकते, असे राजकीय जाणकार सांगत आहेत. तेव्हा गणपती बाप्पांच्या नंतर दिवाळीतही फटाके फोडले जाणार असल्याने कोणाचे फटाके कोण वाजवणार यावर बरेच गणित आवलंबून असणार आहे. मात्र, दिवाळीत नेते मंडळीचे फटाके फुटणार हे नक्की. यावरून एक गोष्ट नक्की झाली आहे, ती म्हणजे कराड उत्तर आणि दक्षिणेत यंदाची विधानसभा निवडणूक काटे की टक्कर होणार आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker