भरदिवसा सशस्त्र दरोडा : दरोडेखोरांनी गोळीबार करत आख्खं रिलायन्स ज्वेलर्स लुटले
सातारा, सांगली व कोल्हापूर पोलिस अलर्ट

सांगली | सांगलीत फिल्मी स्टाईल दरोडेखोरांनी रिलायन्स ज्वेलर्सवर सशस्त्र दरोडा टाकला. आज भरदिवसा (दि. 4) दराेडेखाेरांनी गोळीबार करत अख्खे दुकान लुटले. दरोडेखोरांनी दुकानातील कर्मचाऱ्यांना बांधून गोळीबार करत दुकान लुटले. या दरोड्यानंतर सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील पोलीस अलर्ट असून वाहनांची कसून तपासणी करत आहेत.
सांगली -मिरज रस्त्यावर रिलायन्स ज्वेलर्सचे दुकान आहे. या रस्त्यावर एक झाड आज दुपारी तोडण्यात येत असल्याने रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता. त्याचा फायदा घेत 6 ते 7 जणांच्या दरोडेखोरांच्या टोळीने दरोडा टाकला. दरोडेखोरांनी दुकानातील कर्मचाऱ्यांना बांधून घालून दुकानातील सर्व सोने आणि हिरे लुटले आहेत. या वेळी एका ग्राहकाने दुकानातून पलायन करण्याचा प्रयत्न केला. यावेळी ग्राहकाच्या दिशेने दरोडेखोरांनी गोळीबार केला. ताे थाोडक्यात बचावला. मात्र, शाोरुमच्या तळमजल्यामध्ये पडून जखमी झाला आहे. दरोडेखोर दुकानातून बाहेर पडल्यानंतर मिरजच्या दिशेला गेल्याचे सांगण्यात येत आहे.
दरोडेखोरांचा माग काढण्यासाठी श्वानपथक पाचारण करण्यात आले; परंतु दुकानाबाहेर श्वान घुटमळले. दरम्यान, दरोडेखोरांच्या मागावर स्थानिक गुन्हे अन्वेषणची पथक रवाना करण्यात आली आहेत. दरोडेखोरांनी वापरलेली पांढऱ्या रंगाची टाटा सफारी क्रमांक (एमएच- 04- 8994) ही एका सीसीटीव्हीत कैद झाली आहे.