पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी समाजासाठी काम करण्याची शिकवण दिली : अमित शहा
लाखो श्रीसदस्यांच्या उपस्थितीत पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान

नवी मुंबई | वीरता, भक्ती व सामाजिक चेतना या तीन मार्गांनी देशाला दिशा देण्याचे काम महाराष्ट्राने केले आहे. महाराष्ट्र भूषण डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांनीही समाजासाठी, दुसऱ्यांसाठी, समाज बांधवांसाठी काम करण्याची शिकवण दिली आहे. या देशाला ‘सर्वे भन्वतुः सुखिनः’ या मंत्राची आवश्यकता असताना लाखो लोकांची फळी उभी करण्याचे काम आप्पासाहेबांनी केले आहे, अशा शब्दांत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गौरव केले. राज्य शासनाच्या वतीने पद्मश्री डॉ. आप्पासाहेब ऊर्फ दत्तात्रेय धर्माधिकारी यांना सन 2022 चा महाराष्ट्र भूषण हा सन्मान आज केंद्रीय गृहमंत्री व सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते देण्यात आला. त्यावेळी श्री. शहा बोलत होते.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील, रायगडचे पालकमंत्री उदय सामंत, ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, खासदार श्रीरंग बारणे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार प्रशांत ठाकूर, राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, धर्माधिकारी प्रतिष्ठानचे डॉ. सचिन धर्माधिकारी, उमेश धर्माधिकारी आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
मानवता हाच सर्वश्रेष्ठ धर्म हा विचार रुजवायला हवा – डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी
पुरस्काराला उत्तर देताना डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी म्हणाले की, माझ्या आयुष्यातील हा भाग्याचा क्षण आहे. पुरस्कार हा मोठाच असतो. कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार दिल्याने हा त्या कार्याचा गौरव आहे. या सगळ्यांचे श्रेय सर्व श्री सदस्यांना जाते. खेड्यागावातील लोकांना, त्यांच्या रितीरिवाजांना चांगले उत्तम वळण लागायला हवे, यासाठी कामाची सुरुवात केली.
प्रसिद्धीपासून लांब राहत कार्य सुरू आहे. मानवता धर्म हा सर्वात श्रेष्ठ आहे, या विचारांची रुजवात अंतकरणात व्हायला हवे. शेवटच्या श्वासापर्यंत हे कार्य सुरू ठेवणार आहे. सचिनदादा हे कार्य पुढे चालविणार आहेत. कार्य हे श्रेष्ठ आहे. माणूस नसला तरी ते सुरूच राहणार आहे. हा पुरस्कार म्हणजे आपल्या कार्याचा सन्मान आहे. त्यामुळे हा पुरस्कार सर्वांना समर्पित करत असल्याचेही श्री. धर्माधिकारी म्हणाले.
पुरस्काराची रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीला सुपूर्द
कोकण विभागासह राज्यातील विविध भागातून आलेल्या सुमारे 20 लाखाहून अधिक श्री सदस्यांच्या साक्षीने डॉ. आप्पासाहेबांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मानपत्र, सन्मानचिन्ह व पंचवीस लाखांचा धनादेश असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. डॉ. धर्माधिकारी यांनी पुरस्काराची पंचवीस लाख रुपयांची रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीला सुपूर्द केली.
भव्यदिव्य कार्यक्रम
अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने मोठ्या उत्साहात नवी मुंबईतील खारघर येथील कार्पोरेट पार्कच्या मैदानावर हा भव्य समारंभ संपन्न झाला. समारंभात पिण्याचे पाणी, शौचालय, आरोग्य सुविधा, वाहनतळ सुविधा, श्री सदस्यांची बसण्याची व्यवस्था आदींचे काटेकोर नियोजन करण्यात आले होते. कार्यक्रमस्थळी शासकीय यंत्रणेसह डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या श्री सदस्यांनी व्यवस्था चोख सांभाळली. या कार्यक्रमासाठी सुमारे साडेतीनशेहून अधिक एकर मैदानात सुमारे 20 लाखाहून अधिक नागरिक, श्रीसदस्य उपस्थित होते. त्यांना कार्यक्रम व्यवस्थित दिसावा यासाठी एकूण 58 भव्यदिव्य असे एलईडी स्क्रिन उभारण्यात आले होते. त्याचबरोबर प्रत्येक सदस्यांपर्यंत कार्यक्रमाचा आवाज पोहचावा, यासाठी ध्वनिक्षेपण यंत्रणा उभारण्यात आली होती.



