कराड आरटीओची दुचाकींसाठी नवी मालिका सुरू
‘एमएच-५० एबी’ क्रमांकांसाठी आजपासून अर्ज; आकर्षक नंबर मिळविण्याची संधी

कराड : – कराड आणि पाटण तालुक्यात नव्याने नोंदणी होणाऱ्या दुचाकी वाहनांसाठी उप-प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) ‘MH-50 AB’ या नवीन क्रमांक मालिकेला सुरुवात केली आहे. 0001 ते 9999 या क्रमांकांचा समावेश असलेली ही मालिका बुधवार 24 जूनपासून उपलब्ध होत असून, आकर्षक नोंदणी क्रमांक मिळविण्यासाठी वाहनधारकांकडून अर्ज स्वीकारले जाणार आहेत.
उप-प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय इंगवले यांनी दिलेल्या माहितीनुसार, पसंतीचा किंवा आकर्षक क्रमांक आरक्षित करण्यासाठी इच्छुक वाहनधारकांनी विहित शुल्कासह राष्ट्रीयकृत बँकेचा डिमांड ड्राफ्ट सादर करणे आवश्यक आहे. यासाठी अर्ज स्वीकारण्याची वेळ सकाळी 10 ते दुपारी 2 अशी निश्चित करण्यात आली आहे.
एखाद्या क्रमांकासाठी केवळ एकच अर्ज प्राप्त झाल्यास संबंधित अर्जदाराला त्याच दिवशी क्रमांक मंजूर केला जाईल. मात्र, एका क्रमांकासाठी एकापेक्षा अधिक अर्ज आल्यास संबंधित अर्जदारांकडून निर्धारित शुल्कापेक्षा अधिक रकमेचा डिमांड ड्राफ्ट बंद लिफाफ्यात मागविण्यात येईल. कार्यालयीन कामकाजाच्या दुसऱ्या दिवशी दुपारी 2 वाजेपर्यंत हे धनाकर्ष सादर करावे लागणार असून सर्वाधिक रक्कम देणाऱ्या अर्जदाराला तो क्रमांक देण्यात येणार आहे. उर्वरित अर्जदारांचे धनाकर्ष तत्काळ परत केले जाणार आहेत.
दरम्यान, आकर्षक क्रमांक आरक्षित केल्यानंतर संबंधित वाहनाची नोंदणी 180 दिवसांच्या आत करणे बंधनकारक असल्याचे आरटीओ प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे आवडीचा वाहन क्रमांक मिळविण्याची संधी वाहनधारकांना उपलब्ध झाली आहे.



