विधान परिषद निवडणूक : कराडातील राजकीय घडामोडींनी कसा घेतला वेग
अभयसिंह जगतापांची मंत्री जयकुमार गोरेंवर टीका

सातारा :- सातारा-सांगली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी आज मतदान पार पडले. एकूण 895 मतदारापैकी 894 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. सातारा जिल्ह्यातील सर्वच 7 मतदान केंद्रावर 100 टक्के झाले. सांगली जिल्ह्यातील 5 मतदान केंद्रापैकी 4 मतदार केंद्रावर 100 टक्के मतदान झाले. तर विटा येथे केवळ एकाचे मतदान झाले नाही. गोवा सहलीवर असलेले भाजपाचे मतदार कराडला 3 हाॅटेलवर थांबविण्यात आले होते. तर काही मतदार महाबळेश्वरमध्ये कालच आणण्यात आले होते.
गोवा सहलीवरून रात्री 9 वाजता कराड व पाटण तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्य द फर्न या हाॅटेलवर मुक्कामाला होते. त्यानंतर रात्री 10 वाजता चार ट्रॅव्हल्समधून माण, खटाव, कोरेगाव आणि फलटणचे मतदार सत्यजित विट्स हाॅटेलवर मुक्कामाला दाखल झाले होते. सकाळी 8 वाजता चहा, नाष्टा करून 9 वाजण्याच्या सुमारास चारही तालुक्यातील मतदार मतदानासाठी रवाना झाले. तर द फर्न येथील मतदारांची सकाळी 9.30 वाजता ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि उमेदवार धैर्यशील कदम यांनी भेट घेवून बैठक घेतली.
सातारा व सांगली जिल्ह्यातील पहिले मतदान मलकापूरचे नगरसेवक उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे नगरसेवक नितीन काशीद यांनी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास पहिले मतदान केले. त्यानंतर मलकापूरच्याच नगरसेविका स्वाती थोरात यांनी मतदान केले. सकाळी 11.30 वाजता भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार अतुल भोसले स्वतः ट्रॅव्हल्समधून भगवे फेटे परिधान केलेले मलकापूर आणि कराड शहरातील नगरसेवकांना घेवून कराड येथील प्रशासकीय कार्यालयातील मतदान केंद्रावर दाखल झाले. यावेळी अतुल भोसले यांनी महायुतीचे उमेदवार धैर्यशील कदम यांच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला.
अपक्ष नगरसेवक भाऊसाहेब माऊर यांनी स्वतंत्रपणे एकटेच येत मतदानाचा हक्क बजावला. भाजप नगरसेवकांच्या पाठोपाठ लोकशाही आघाडीच्या नगरसेवकांनी चारचाकी गाडीतून एकत्रित येत मतदानाचा हक्क बजावला. तर दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास मलकापूर नगर परिषदेचे नगरसेवक दादासो शिंगण यांनी कोल्हापूरच्या हॉस्पिटल मधून थेट कराडला ॲम्बुलन्स मधून येवून व्हीलचेअर वरून आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.
कराड शहरातील एकूण 60 पैकी 51 मतदारांनी 1.30 वाजण्याच्या आत आपला मतदानाचा हक्क बजावला. तर यशवंत विकास आघाडीच्या नगरसेवकांनी 1.30 ते 3 राहू केतू काळ असल्याने तीन वाजेनंतर आपला मतदानाचा हक्क बजावला असल्याचे नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांनी स्वतः सांगितले. दुपारी 3.30 वाजता सर्वच्या सर्व 60 नगरसेवक, नगराध्यक्ष यांनी आपला मतदाना हक्क बजावला.
भाजपाचे उमेदवार धैर्यशील कदम यांचे बंधू सत्वशील कदम काल रात्रीपासूनच कराडमध्ये ठाण मांडून होते. तसेच दिवसभर मतदान केंद्राच्या बाहेर उभे राहिलेले पहायला मिळाले. यावेळी लोकशाही आघाडीचे अध्यक्ष जयंत पाटील, काॅंग्रेसचे जिल्हाध्यक्ष नामदेव पाटील, अजित पाटील- चिखलीकर यांच्यासह महाविकास आघाडीचे उमेदवार अभयसिंह जगताप हे मतदान केंद्रावर आले होते.
अभयसिंह जगतापांची जयकुमार गोरेंवर टीका
महाविकास आघाडीचे उमेदवार अभयसिंह जगताप यांनी कराडच्या मतदान केंद्राला भेट दिली. तसेच विजयाची 100 टक्के खात्री असून क्रांती होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. राष्ट्रवादी, शिवसेनेचे मतदार जिल्हा परिषदेतील राड्यामुळे चिडलेले आहेत. कराडमध्ये काही दिवसापूर्वी मंत्री जयकुमार गोरे यांनी अभयसिंह जगताप यांची उंची वाढली. परंतु, बुध्दी बालिश असल्याचे म्हटले होते. यावर अभयसिंह जगताप यांनी, जयकुमारे गोरेंच शिक्षण किती, माझी बुध्दी ठरवणारे कोण? मी चारवेळी एमपीएसी क्लेअर केलेला मी माणूस आहे. माझी स्वतः ची साॅफ्टवेअर कंपनी असलेला मी माणूस आहे. त्यामुळे माझ्या बुध्दीमतेच्या जवळपास त्यांनी येवू नये.



