
कराड :- पश्चिम महाराष्ट्रातील हृदयरोग उपचार क्षेत्रात कराडच्या संजीवन मेडिकल सेंटरने आणखी एक ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. सातारा जिल्ह्यात 2023 मध्ये पहिली TAVI (ट्रान्सकॅथेटर एऑर्टिक व्हॉल्व्ह इम्प्लांटेशन) शस्त्रक्रिया यशस्वीपणे करणाऱ्या संजीवन मेडिकल सेंटरने आतापर्यंत आठ TAVI प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर आता एकाच दिवशी दोन हृदयरुग्णांवर TAVI प्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडत पश्चिम महाराष्ट्रातील असा विक्रम करणारे एकमेव रुग्णालय म्हणून नवा मान मिळविला आहे. अत्यंत क्लिष्ट आणि उच्च तंत्रज्ञानावर आधारित या प्रक्रियेमुळे दोन्ही रुग्णांना नवजीवन मिळाले असून संजीवन मेडिकल सेंटरने प्रगत हृदयरोग उपचारातील आपले अग्रस्थान पुन्हा अधोरेखित केले आहे.
इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट डॉ. विजयसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली अनुभवी हृदयरोग तज्ज्ञांच्या पथकाने अत्याधुनिक कॅथलॅबमध्ये आधुनिक इमेजिंग तंत्रज्ञानाच्या सहाय्याने दोन्ही प्रक्रिया अत्यंत अचूकपणे पूर्ण केल्या. प्रक्रियेनंतर दोन्ही रुग्णांची प्रकृती स्थिर असून ते उपचारांना उत्तम प्रतिसाद देत आहेत तसेच प्रक्रियेनंतर चौथ्या दिवशी रुग्णास घरी सोडण्यात येत असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली. (टावी) ही गंभीर एऑर्टिक व्हॉल्व्ह स्टेनोसिस असलेल्या रुग्णांसाठी आधुनिक, सुरक्षित आणि प्रभावी उपचारपद्धती मानली जाते. या आजारात हृदयातील एऑर्टिक झडप अरुंद झाल्याने शरीराला होणारा रक्तपुरवठा कमी होतो. परिणामी श्वास लागणे, छातीत दुखणे, चक्कर येणे, बेशुद्ध पडणे तसेच हृदय निकामी होण्याचा धोका वाढतो. विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि ओपन हार्ट शस्त्रक्रियेचा धोका असलेल्या रुग्णांसाठी ही प्रक्रिया जीवदान देणारी ठरते.
या प्रक्रियेत छाती न उघडता मांडीतील रक्तवाहिनीद्वारे विशेष कॅथेटरच्या साहाय्याने नवीन जैविक एऑर्टिक व्हॉल्व्ह हृदयात बसविण्यात येतो. त्यामुळे मोठ्या शस्त्रक्रियेची गरज राहत नाही, रक्तस्त्राव कमी होतो, रुग्ण लवकर बरा होतो आणि रुग्णालयातील मुक्कामही कमी होतो. त्यामुळे आधुनिक हृदयरोग उपचारामध्ये ही अत्यंत प्रभावी आणि रुग्णस्नेही पद्धत म्हणून ओळखली जाते. या यशस्वी प्रक्रियेत कार्डियाक ॲनेस्थेशिया तज्ज्ञ डॉ. सुहास पाटील, इकोकार्डिओग्राफी तज्ज्ञ डॉ. पुनम बागल, कॅथलॅब टीममधील अमित चोपडे, धनश्री पाटील, जगदीश तसेच अतिदक्षता विभागातील डॉ. तृप्ती फरांदे, स्वप्नील साळुंखे आणि अन्य वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे मोलाचे योगदान लाभले.
डॉ. विजयसिंह पाटील म्हणाले, “2023 मध्ये सातारा जिल्ह्यातील पहिली प्रक्रिया करण्याचा मान संजीवन मेडिकल सेंटरला मिळाला होता. आतापर्यंत आठ यशस्वी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर आता एकाच दिवशी दोन प्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण करून आम्ही आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. ग्रामीण आणि निमशहरी भागातील रुग्णांना पुणे-मुंबईसारख्या महानगरांत न जाता अत्याधुनिक हृदयरोग उपचार त्यांच्या परिसरातच उपलब्ध करून देणे, हे आमचे ध्येय आहे.“
संजीवन मेडिकल सेंटरचे चेअरमन डॉ. राजाराम पाटील यांनी संपूर्ण वैद्यकीय पथकाचे अभिनंदन करताना सांगितले, “ग्रामीण भागातील रुग्णांना महानगरांप्रमाणेच जागतिक दर्जाच्या आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. 2023 मध्ये जिल्ह्यातील पहिली प्रक्रिया करून सुरू झालेल्या प्रवासाला आज एकाच दिवशी दोन यशस्वी प्रक्रियांनी नवी उंची मिळाली आहे. हे यश तज्ज्ञ डॉक्टरांचे कौशल्य, अत्याधुनिक कॅथलॅब, आधुनिक तंत्रज्ञान आणि समर्पित टीमवर्कचे फलित आहे.“
संजीवन मेडिकल सेंटरमध्ये अत्याधुनिक कॅथलॅबच्या माध्यमातून अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, IVUS, OCT , रोटाब्लेशन, इंट्राव्हॅस्क्युलर लिथोट्रिप्सी, पेसमेकर प्रत्यारोपण तसेच सारख्या प्रगत स्ट्रक्चरल हार्ट प्रक्रिया नियमितपणे केल्या जात आहेत. या नव्या यशामुळे संजीवन मेडिकल सेंटरने सातारा जिल्हा आणि पश्चिम महाराष्ट्रातील प्रगत हृदयरोग उपचारातील अग्रगण्य आणि विश्वासार्ह केंद्र म्हणून आपली ओळख अधिक भक्कम केली आहे.



