सेवानिवृत्त पोलिसांचा बंगला फोडला : चोरट्यांनी 30 तोळ्यावर मारला डल्ला
कराड तालुक्यातील घटना

उंब्रज | भुयाचीवाडी (ता. कराड) येथे सेवानिवृत्त पोलिसाच्या बंद असलेल्या बंगल्याच्या दरवाजाचे कुलूप अज्ञात चोरट्यांनी तोडून कपाटातील रोख रक्कमेसह सुमारे 30 तोळे सोन्याचे दागिने असा लाखो रूपयांचा ऐवज चोरून पोबारा केल्याची घटना घडली. नाईकबा यात्रेला गेलेल्या सेवानिवृत्त पोलिसांचा बंगला फोडल्याची नोंद रात्री उशिरा उंब्रज पोलिस ठाण्यात झाली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत सेवानिवृत्त पोलिस सुरेश धोंडीराम कदम (मुळ गांव- भुयाचीवाडी ता.कराड, सध्या रा.कल्याण भिवंडी- ठाणे) यांनी उंब्रज पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, जानुगडेवाडी (ता.पाटण) येथे फिर्यादी हे नाईकबा यात्रेनिमित्त गेले होते. जाताना त्यांनी बंगल्याचा सेप्टी दरवाजा बंद करून त्यास कुलप लावण्यात आले होते. सोमवार दिनांक २७ मार्च रोजी फिर्यादी यांचे बंधू यांनी फोन करून सांगितले की, बंगल्याचा सेफ्टी दरवाजाचे कुलुप तोडून बंगल्यात चोरी झालेली आहे. चोरट्यानी बंगल्याच्या मुख्य दरवाज्याचा कोयंडा तोडुन बंगल्यात प्रवेश करून बेडरूममध्ये असलेले लोखंडी कपाट कटावणीने उचकटून त्यामध्ये असणारे लाखो रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून नेली आहे.
चोरट्यानी कपाटातील सर्व साहित्य अस्ताव्यस्त करून कपाटातील 1 लाख 80 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे साडे चौदा तोळ्यांची तीन गंठण, 40 हजारांचे दिड तोळ्याचे मिनी गंठन, 80 हजार रुपये किंमतीचा अडीच तोळ्याचा व दिड तोळ्याचा लक्ष्मी हार, 60 हजार रुपये किंमतीची अडीच तोळ्याची चैन व अर्ध्या तोळ्याची चैन, 50 हजार रुपये किंमतीची एक तोळ्याची हि-याच्या अंगठीसह अर्ध्या तोळ्याच्या तीन अंगठ्या तसेच 20 हजारांची 1 तोळ्याची कर्णफुले, 80 हजार रुपये किंमतीची चार तोळ्याची चैन व 6 हजारांची रोख रक्कम असा मिळून सुमारे 5 लाख 16 हजारांचा ऐवज चोरीला गेला असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले असून, या सर्व सोन्याच्या दागिन्यांची सध्य परिस्थितीच्या बाजारभावाने चोरीला गेलेल्या 30 तोळे सोन्याची किंमत 18 लाख रुपयांच्या आसपास होत आहे. याबाबत अज्ञात चोरट्यांच्या विरोधात रात्री उशिरा उंब्रज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, अधिक तपास सपोनि अजय गोरड करीत आहेत.
कामचुकार कर्मचारी वठणीवर आणा…..!
वाहतूक पोलिसांची चौकात उभे राहून दबंगिरी,बिट अंमलदारांची नेमलेल्या हद्दीत होणारी डोळेझाक, डोके वर काढणारी दादागिरी यामुळे कर्तव्यदक्ष सहायक पोलिस निरीक्षक अजय गोरड यांना पुन्हा नव्याने पोलिसांना प्रशिक्षित करावे लागणार असल्याची चर्चा असून लागोपाठ होणाऱ्या चोऱ्या खबऱ्यांचे नेटवर्क तसेच टेक्निकल मुद्दे दुर्लक्षित झाल्याने तर होत नाही ना ? अशीच कुजबुज असून रात्रीच्या वेळी सायरन वाजवत गाडी आल्यावर चोरटे लपुनच बसणार आहेत यामुळे सपोनि अजय गोरड यांच्या स्टाईलने कर्मचाऱ्यांना वठणीवर आणावे लागणार आहे.