वाकुर्डे योजनेच्या पाण्याचे डॉ. अतुल भोसले यांच्या हस्ते पूजन
कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अतुल भोसले यांच्या पुढाकारामुळे कृष्णा कारखान्याच्या माध्यमातून, वाकुर्डे योजनेच्या थकीत वीजबिलाची रक्कम नुकतीच भरण्यात आली. त्यामुळे आता वाकुर्डे उपसा जलसिंचन योजनेचे पाणी दक्षिण मांड नदीत सोडण्यात आले असून, नांदगाव (ता. कराड) येथे या पाण्याचे पूजन डॉ. अतुल भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. तीव्र पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या उंडाळे विभागातील शेतकऱ्यांना वाकुर्डे योजनेचे पाणी उपलब्ध झाल्याने दिलासा मिळाला आहे.
कराड तालुक्यातील काले, ओंड, ओंडोशी, नांदगाव, मनव, उंडाळे, शेवाळवाडी, जिंती, टाळगाव, घोगाव, येणपे, वाठार, झुजारवाडी, पवारवाडी, चोरमारवाडी, माटेकरवाडी, येळगाव, गोटेवाडी, म्हारूगडेवाडी, आकाईवाडी, साळशिरंबे या गावातील ग्रामस्थांना वाकुर्डे योजनेच्या माध्यमातून शेतीसाठी व पिण्यासाठी पाणीपुरवठा केला जातो. पण या योजनेचे वीजबिल थकीत असल्याने या भागातील लोकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत होता. या पार्श्वभूमीवर वाकुर्डे योजनेचे थकीत वीज बिल कृष्णा कारखान्यामार्फत अदा करावे, अशी मागणी या भागातील शेतकऱ्यांनी डॉ. अतुल भोसले यांच्याकडे केली होती. या मागणीची दखल घेत, य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनानुसार थकीत विजबिलाचा 3 लाखांचा चेक नुकताच वारणा कालवे विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आला होता. त्यानुसार वाकुर्डे योजनेचे पाणी दक्षिण मांड नदीत सोडण्यात आले आहे. दक्षिण मांड नदीत पाणी आल्याने या भागातील पाणीटंचाईचा प्रश्न मार्गी लागला असून याबद्दल विविध गावातील ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करत, डॉ. सुरेश भोसले व डॉ. अतुल भोसले यांचे आभार मानले आहेत.
याप्रसंगी य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे संचालक दयानंद पाटील, भाजपाचे तालुकाध्यक्ष पैलवान धनंजय पाटील, कृष्णा बँकेचे संचालक शिवाजीराव थोरात, नांदगावचे सरपंच हंबीरराव पाटील, सोसायटी चेअरमन दिलीप पाटील, माधवराव पाटील, शिवाजीबापू पाटील, विजय यादव, अभिजीत कोठावळे, सर्जेराव पाटील, भीमराव थोरात, राजेंद्र थोरात, पंकज पाटील, आबा शेडगे, दत्ता म्हारुगडे, मनवचे उपसरपंच दादासो शेवाळे, अशोक पाटील, तुळसणचे माजी सरपंच अजित पाटील, बाबुराव मोरे, ॲड. ए. वाय. पाटील यांच्यासह विविध गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.