पुणे- मिरज मार्गावर दर मंगळवारी एक्सप्रेस रेल्वे धावणार : पाच ठिकाणी थांबणार


कराड । पुणे- मिरज लोहमार्गावर आता दर मंगळवारी पुणे- मिरज- पुणे एक्सप्रेस ही गाडी सुरू होणार आहे. या मार्गावर सुरू होणाऱ्या रेल्वेमुळे सातारा, सांगली व पुणे जिल्ह्यातील प्रवाशांना फायदा होणार आहे. गेल्या अनेक दिवसापासून ही गाडी सुरू करण्याची प्रवाशांची मागणी होती. मध्य रेल्वेने प्रवाशांच्या मागणीचा विचार केला असून आता जून महिन्यापासून ही गाडी सुरू होत आहे.
सद्या लोहमार्ग दुहेरीकरण व विद्युतीकरण काम सुरू आहे. या मार्गावरील लोकल व एक्सप्रेस रेल्वे गाड्यांमुळे प्रवाशांचा सुलभ प्रवास होत आहे. मध्य रेल्वेने दर मंगळवारी पुणे – मिरज – पुणे एक्सप्रेस सुरू केली असून, सहा जूनपासून ती सेवेत दाखल होत आहे. ही गाडी पुणे येथून सकाळी आठ वाजता सुटेल. व दुपारी पावणेदोन वाजता मिरज येथे पोहचेल. तेथून सव्वादोन वाजता सुटणारी गाडी रात्री पावणेआठ वाजता पुणे येथे पोहचणार आहे. या गाडीला जेजुरी, लोणंद, सातारा, कऱ्हाड व सांगली हे पाच थांबे आहेत. या गाडीमुळे पश्चिम महाराष्ट्रातील प्रवाशांची सोय झाली आहे.
पुणे – मिरज – पुणे एक्सप्रेसचा असा राहील प्रवास
पुणे – मिरज (01423) सकाळी आठ वाजता पुण्याहून सुटेल, 8.53/8.55 जेजुरी, 9.33/9.35 लोणंद, 10.32/10.35 सातारा, 11.27/11.30 कराड, 12.17/12.30 सांगली, दुपारी 1.45 वाजता मिरज येथे पोहचेल.
मिरज – पुणे (01424) दुपारी 2.25 वाजता मिरज येथून सुटेल, 2.37/2.40 सांगली, 3.28/3.30 कराड, 4.27/4.30 सातारा, 5.28/5.30 लोणंद, 6.05/6.07 जेजुरी व रात्री 7.40 वाजता पुणे येथे पोहचेल.



