शाहीर आंबी, श्वेता कुलकर्णी, विकास भोसलेंना गुंफण पुरस्कार जाहीर

सातारा । विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल गुंफण अकादमीच्या वतीने देण्यात येणारे यावर्षीचे गुंफण पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. रविवारी (दि.11 जून) कराड तालुक्यातील मसूर येथे आयोजित 18व्या गुंफण सद्भावना साहित्य संमेलनात या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती गुंफण अकादमीचे अध्यक्ष डॉ. बसवेश्वर चेणगे यांनी दिली.
विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व समाजाच्या जडणघडणीत मोलाचे योगदान देणाऱ्या व्यक्तींचा अकादमीच्या वतीने गुंफण पुरस्कार देऊन सन्मान केला जातो. सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह, शाल व पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. दरवर्षी गुंफण सद्भावना साहित्य संमेलनात मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करून या मान्यवरांचा सन्मान केला जातो.
यावर्षी चौफेर कामगिरीबद्दल श्वेता कुलकर्णी (पुणे) यांना गुंफण गुणगौरव पुरस्कार, राष्ट्रपती पारितोषिक विजेते शाहीर बजरंग आंबी (सांगली) यांना गुंफण सांस्कृतिक पुरस्कार, पुष्पा आष्टीकर (नागपूर) यांना गुंफण साहित्य पुरस्कार, डॉ. चंद्रकांत शेटे (सातारा) यांना गुंफण सामाजिक पुरस्कार, दशरथ परब (पणजी, गोवा) यांना गुंफण सद्भावना पुरस्कार, भरत सुरसे (पुणे) यांना गुंफण शैक्षणिक पुरस्कार, डॉ. रमेश लोखंडे (मसूर) यांना गुंफण वैद्यकीय पुरस्कार आणि ज्येष्ठ पत्रकार शंकर पाटील यांच्या नावाने दिला जाणारा शंकर पाटील गुंफण पत्रकारिता पुरस्कार पत्रकार विकास भोसले (कराड) यांना जाहीर झाला आहे.
मसूर येथे रविवारी गुंफण अकादमीच्या वतीने अठरावे गुंफण सद्भावना साहित्य संमेलन होत असून त्याच्या समारोप समारंभात दुपारी चार वाजता खासदार श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते व सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई, पुण्याचे जिल्हा न्यायाधीश सुनील वेदपाठक, ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक बबन पोतदार यांच्या प्रमुख उपस्थितीत या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे, असे डॉ. चेणगे यांनी सांगितले.