Satara News : पाठलाग करून पोलिसांनी टेम्पोसह 25 लाखांचा गुटखा पकडला


कराड । कर्नाटक राज्यातून पुण्याकडे नेण्यात येत असलेला 42 पोती गुटखा कराड तालुक्यातील वराडे गावच्या हद्दीत तळबीड पोलिसांनी पाठलाग करून पकडला. या कारवाईत गुटख्याची 42 पोत्यासह टेम्पो असा एकूण 25 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी टेम्पो चालक विलास बलू जाधव (वय- ४५ रा. निगडी ता. पिंपरी चिंचवड जि. पुणे मुळ रा.सनमडी ता. जत सांगली) व क्लिनर सचिन संजय रेड्डी (वय- 20 रा. कुमठा ता. औसा जि.लातूर सध्या रा. सानेचीक सानेचेवर बिल्डींग चिखली जि.पुणे) यांना ताब्यात घेतले असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलीसांनी दिलेली माहिती अशी, वराडे (ता. कराड) येथे पुणे- बेंगलोर महामार्गावर बेकायदेशीर 16 लाख 94 हजार रूपयांचा गुटखा व 8 लाखांचा अशोक लेलन्ट टेम्पो असा एकूण 25 लाख 12 हजार 200 रूपये किमतीचा मुद्देमाल वाहतूक करीत असताना तळबीड पोलीसांनी कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे. शुक्रवारी मध्यरात्री रात्रगस्त सुरू असताना बातमीदार मार्फत टेम्पो क्रमांक (एम.एच- 14 के क्यु- 4187) मधून कर्नाटक राज्यातून महाराष्ट्र राज्यात गुटखा विक्री करण्यासाठी आणला जाणार आहे, अशी माहिती मिळाली होती. सहा. पोलीस निरीक्षक राहूल वरोटे तसेच पोलीस स्टेशनचा स्टाफ निलेश विभुते, पो. कॉ. प्रविण गायकवाड असे तासवडे टोलनाका येथे थांबून वाहनाची तपासणी करीत होते. यावेळी एक अशोक लेलन्ट टेम्पो टोल भरुन जात असाताना त्यास थांबण्याचा इशारा केला. परंतू तो न थांबता तसाच निघून पुणे बाजूकडे भरधाव वेगात गेला. तेव्हा त्याचा पाठलाग करुन वराडे गावचे हद्दीत थांबवून त्यातील ड्रायव्हर याचे विचारपुस केली असता. त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली. तेव्हा सदर वाहनाची बातमी असल्याने त्या वाहनास ताब्यात घेवून पोलीस ठाणेत आणले. या वेळी टेम्पोची तपासणी केली असता विमल गुटखा व बी-1 कंपनीची तंबाखू अशी एकूण 42 पोती मिळून आली. सदर गुन्हयाचा तपास पो. उपनिरीक्षक एस. एम. पिसाळ हे करीत आहेत.
सदर प्रकरणी सदरचा गुन्हा पोलीस अधीक्षक समीर शेख व अपर पोलीस अधीक्षक बापू बांगर, कराडचे उप विभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांनी केले मार्गदर्शनानुसार सपोनि तळबीड आर. आर. वरोटे, पो. फौजदार पिसाळ, पो. फौजदार खराडे पो. हवा ओंबासे, पो. कॉ. विभूते, सहा म. पो. शि. साळुंखे, म. पो. शि मोहिते, चालक पो. कॉ. गायकवाड यानी सदरची कारवाई केली.



