ताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रब्रेकिंगराजकियराज्यसातारा

मलकापुरात काँग्रेसला खिंडार : ज्येष्ठ नेत्यांनी केला भाजपात प्रवेश

तानाजी देशमुख / कराड

मलकापुरातील काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे कट्टर समर्थक समजले जाणारे मलकापूरचे माजी सभापती व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शंकरराव चांदे आणि काँग्रेसचे मलकापूर शहराध्यक्ष, माजी सभापती प्रशांत चांदे यांची काँग्रेसला सोडचिठ्ठी..

मुंबईत भाजप प्रदेश कार्यालयात कराड दक्षिणचे आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांचे नेतृत्व स्वीकारत, काँग्रेसच्या हजारो कार्यकर्त्यांनी केला भाजपमध्ये जाहीर प्रवेश..सामाजिक कार्यकर्ते सतीश चांदे, धनाजी देसाई यांचाही भाजप प्रवेश..

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे मंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे, पक्षाचे कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण, राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, ना. अतुल सावे, आ.डॉ. अतुलबाबा भोसले, आ. समाधान आवताडे यांनी केले स्वागत..

मलकापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत चांदे हे मलकापूर नगरपालिकेचे माजी नगरसेवक असून, शिक्षण व नियोजन सभापती म्हणून कार्यरत होते. तर ज्येष्ठ नेते शंकरराव चांदे हे मलकापूर नगरपालिकेत तब्बल १५ वर्षे नगरसेवकपदी राहिलेले आहेत. यापैकी १० वर्षे ते बांधकाम सभापती, तसेच शिक्षण व नियोजन सभापती म्हणून कार्यरत राहिले आहेत. नगरपालिका होण्यापूर्वी जवळपास १२ वर्षे ते मलकापूर ग्रामपंचायतीचे सदस्य होते. प्रशांत शिवाजी चांदे हे त्यांचे पुतणे आहेत.

प्रशांत चांदे व शंकरराव चांदे यांचा भाजप प्रवेश राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व मलकापूरचे माजी उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांना जोरदार धक्का मानला जात आहे.

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना धक्क्यावर धक्के…

– नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा भाजपचे आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांनी दारुण पराभव केला.
– विधानसभा निवडणुकीपूर्वीच मलकापूर नगरपालिकेचे काँग्रेसचे बांधकाम सभापती राजेंद्र यादव यांच्यासह ४ माजी नगरसेवकांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत, डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या नेतृत्वाखाली भाजपमध्ये प्रवेश केला होता.
– नुकताच काँग्रेसचे विंग जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शंकरराव खबाले यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला.
– कराड दक्षिणचे सलग ३५ वर्षे नेतृत्व करणारे माजी मंत्री विलासराव पाटील उंडाळकर यांचे सुपुत्र आणि काँग्रेस नेते उदयसिंह पाटील हे देखील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वाटेवर आहेत.
– काँग्रेसचे एक एक शिलेदार सोडून चालल्याने पृथ्वीराज चव्हाण यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.
– तसेच मलकापूरचे माजी उपनगराध्यक्ष आणि काँग्रेसचे कराड तालुकाध्यक्ष मनोहर शिंदे यांच्या वर्चस्वालाही शह दिल्याचे मानले जात आहे.
– काँग्रेसला दक्षिणमध्ये सगळीकडेच मोठे धक्के बसू लागल्याने येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भाजपचे पारडे जड होत असल्याचे दिसून येत आहे.

ना. चंद्रशेखर बावनकुळे भाषण..

कराड दक्षिणचे आमदार डॉ. अतुलबाबा भोसले हे एक कर्तव्यदक्ष आमदार आहेत. पृथ्वीराज चव्हाण यांना गेल्या २० वर्षात काहीही विकास करता आलेला नाही. पण आ.डॉ. अतुलबाबांचा कामाचा धडाका पाहता, ते या ५ वर्षातच विकासाचा बॅकलॉग भरुन काढतील, असा मला विश्वास आहे. या कर्तव्य तत्परतेमुळेच आ.डॉ. अतुलबाबांचे नेतृत्व स्वीकारुन, कराड दक्षिणमधील अनेक नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते काँग्रेस व पृथ्वीराज चव्हाणांना सोडून भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. या सर्वांचे मी स्वागत करतो. आणि येणाऱ्या निवणुकीत नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती अशा सर्वच ठिकाणी सर्व जागांवर भाजपा-महायुतीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी सर्वांनी कसोशीने प्रयत्न करावेत.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker