सर्वसामान्य शेतकऱ्याचं पोर ते काॅंग्रेसचे जिल्हाध्यक्ष नामदेव पाटील (आप्पा) : संघर्षनायक


सातारा – जिद्द, प्रचंड कष्ट, अथक मेहनत, प्रामाणिकपणा, सर्वांना सोबत घेऊन जाण्याची हातोटी आणि विश्वासार्हता या गुणांच्या बळावर राजकारण, समाजकारण आणि उद्योग क्षेत्रात शून्यातून स्वतःचे वेगळे विश्व निर्माण करणारे, सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून पुढे आलेले यशस्वी युवा उद्योजक तथा काँग्रेसचे सातारा जिल्हाध्यक्ष (Satara district president of Congress) मा. नामदेव काशिनाथ पाटील (आप्पा) यांचा गुरुवार, दि. २८ मे रोजी वाढदिवस उत्साहात साजरा होत आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (बाबा) (Prithviraj Chavan) यांचे अत्यंत विश्वासू आणि जवळचे सहकारी म्हणूनही त्यांनी स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या संघर्षमय आणि प्रेरणादायी कार्याचा घेतलेला हा आढावा…
वारुंजी (ता. कराड) येथील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात कै. काशिनाथ पाटील आणि कै. कुसुम पाटील यांच्या पोटी जन्मलेल्या नामदेव पाटील (Namdev Patil) यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले. आजच्या युवकांसाठी आणि उद्योजक होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी त्यांचा जीवनप्रवास प्रेरणादायी ठरत आहे. पदवी शिक्षण घेत असतानाच त्यांनी ज्येष्ठ बंधू बाळासाहेब पाटील (आबा) आणि मुकुंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शेती व दुग्ध व्यवसायातून आपल्या उद्योग प्रवासाची सुरुवात केली. पुढे वीटभट्टी व्यवसायात पदार्पण करत त्यांनी या क्षेत्रात मोठे यश संपादन केले. त्यानंतर जमीन खरेदी-विक्री आणि बांधकाम व्यवसायात त्यांनी अल्पावधीत मोठी प्रगती साधली. याच काळात “सत्यजित ग्रुप”चा भक्कम पाया रचला गेला.
कराड, मलकापूर, कार्वे नाका, मुंढे, वारुंजी, गोटे परिसरासह विविध भागांत उभारलेल्या भव्य निवासी व व्यापारी इमारतींमुळे नामदेव पाटील यांनी पश्चिम महाराष्ट्रातील यशस्वी युवा बांधकाम उद्योजक म्हणून विशेष ओळख निर्माण केली. “सत्यजित विट्स” या पंचतारांकित हॉटेलच्या उभारणीनंतर त्यांनी हॉटेल व्यवसायातही मोठे यश संपादन केले. ज्या क्षेत्रात पाऊल ठेवले, त्या प्रत्येक क्षेत्रात यश मिळवणारा उद्योजक अशी त्यांची प्रतिमा निर्माण झाली. नामदेव पाटील (आप्पा) यांची यशोगाथा म्हणजे संघर्ष, दूरदृष्टी, कष्ट आणि कुटुंबातील एकजुटीचे उत्तम उदाहरण आहे. कोणतेही काम लहान न समजता प्रामाणिकपणे मेहनत करण्याची वृत्ती हेच त्यांच्या यशाचे खरे गमक ठरले. वीटभट्टी व्यवसायातून सुरू झालेली त्यांची वाटचाल अनेक संकटांवर मात करत यशाच्या शिखरापर्यंत पोहोचली. व्यवसायातील संघर्ष आणि आर्थिक अडचणींचा स्वतः अनुभव घेतल्यामुळे त्यांनी वारुंजी पंचक्रोशीतील नागरिकांना आर्थिक आधार मिळावा या उद्देशाने सन २००५ मध्ये “सत्यजित पतसंस्था” स्थापन केली. आज ही संस्था तब्बल २०० कोटी रुपयांच्या व्यवसायाच्या उंबरठ्यावर पोहोचली असून, हजारो शेतकरी, युवक आणि उद्योजकांना या संस्थेमुळे आर्थिक बळ मिळाले आहे.
जमीन व्यवहार, बांधकाम व्यवसाय आणि हॉटेल क्षेत्रात त्यांनी कमावलेला विश्वास हीच त्यांच्या यशाची खरी ओळख आहे. बंधू, पुतणे नयन तसेच चिरंजीव सत्यजित यांच्या सहकार्याने “सत्यजित” हा ब्रँड विश्वासार्हतेचे प्रतीक बनला आहे. “सत्यजित विट्स” या पंचतारांकित हॉटेलमुळे सातारा, सांगली आणि कोल्हापूर या तिन्ही जिल्ह्यांतील नागरिकांना सर्व सुविधा एकाच छताखाली उपलब्ध झाल्या आहेत. राजकारणातही नामदेव पाटील यांनी आपली वेगळी छाप निर्माण केली. वारुंजी ग्रामपंचायतीचे लोकप्रिय सरपंच आणि पंचायत समिती सदस्य म्हणून त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. अलीकडील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये त्यांनी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर आपल्या पत्नी सौ. सुनंदा नामदेव पाटील (माई) आणि पंचायत समिती गणातून रवींद्र बडेकर यांना विजयी करून पक्षाचे लक्ष वेधून घेतले.
काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष (Satara district president of Congress) निवडीवेळी जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पक्षाच्या भविष्यासाठी नामदेव पाटील यांचीच जिल्हाध्यक्षपदी निवड व्हावी, अशी जोरदार मागणी केली होती. प्रारंभी त्यांनी या पदासाठी अनिच्छा दर्शविली होती; मात्र पक्षहितासाठी त्यांनी जबाबदारी स्वीकारली. जिल्ह्यात काँग्रेसची संघटना अधिक बळकट करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करू, असा विश्वास त्यांनी निवडीनंतर व्यक्त केला.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (बाबा) यांचा विश्वास संपादन करत त्यांनी वारुंजी पंचक्रोशीतील अनेक गावांमध्ये विकासकामांचा डोंगर उभा केला. कार्यकर्ते आणि सर्वसामान्यांच्या मदतीला धावून जाणारा नेता अशी त्यांची प्रतिमा निर्माण झाली आहे. सर्व पक्षांतील नेते आणि पदाधिकाऱ्यांशी त्यांनी जपलेले स्नेहपूर्ण संबंध, त्यांचा संयमी आणि सुसंस्कृत स्वभाव तसेच ‘अजातशत्रू’ नेतृत्वगुण यामुळे येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीत वारुंजी गटातील प्रमुख चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे. भविष्यातील योजनांमध्ये “सत्यजित विट्स” प्रकल्पांतर्गत तीन मजली शॉपिंग मॉल आणि अत्याधुनिक मल्टिप्लेक्स थिएटर उभारण्याचे महत्त्वाकांक्षी काम त्यांनी हाती घेतले असून, ते यावर्षी पूर्ण करण्याचा त्यांचा संकल्प आहे. पाटील कुटुंबाची एकजूट आणि परस्परांतील समन्वय हेच त्यांच्या यशाचे खरे रहस्य मानले जाते. उद्योग, समाजकारण आणि राजकारण या तिन्ही क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मा. नामदेव पाटील (आप्पा) यांना त्यांच्या ५२ व्या वाढदिवसानिमित्त सर्व स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
आज पृथ्वीराज चव्हाण यांच्याहस्ते अभिष्टचिंतन सोहळा
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (बाबा) आणि विविध मान्यवरांच्या उपस्थितीत काँग्रेसचे सातारा जिल्हाध्यक्ष नामदेव पाटील (आप्पा) यांचा जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल जाहीर सत्कार तसेच वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम आज गुरुवार दि. २८ मे रोजी सायंकाळी ५ वाजता हॉटेल सत्यजित विट्स, गोटे-कराड येथे होणार आहे. या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जि.प. सदस्या सौ. सुनंदा नामदेव पाटील (माई) आणि बाळासाहेब काशिनाथ पाटील यांनी केले आहे.



