सातारा- महाबळेश्वर रोडवर दरड कोसळली : कराड तालुक्यात दूध भेसळीवर कारवाई

सातारा – सातारा जिल्ह्यात आज दिवसभरात महत्वाची घडामोड म्हणजे सातारा -महाबळेश्वर रोडवर केळघर घाटात दरड कोसळल्याने सदरील रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. सदरील दरड हटविण्याच्या काम हाती घेण्यात आले असले तरी सध्या या मार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. तर कराड तालुक्यातील शामगाव येथे एफडीआयची दूध भेसळीवर कारवाई केली आहे. तिसरी घटना नीट (NEET) परीक्षेत अपयश आल्याच्या नैराश्यातून कराड तालुक्यातील शेरे स्टेशन येथील १८ वर्षीय विद्यार्थिनीने विषारी औषध प्राशन करून जीवन संपविल्याची दुर्दैवी घटना घडली. उपचारासाठी कृष्णा रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर सोमवारी (दि. २७) तिचा मृत्यू झाला.
शामगाव येथील कारवाई
शामगाव येथील राधे डेरी फार्म वरती एफडीआयची मध्यरात्री केली कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये दुधामध्ये भेसळ होत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. दुधामध्ये पामतेल आणि पावडर मिक्स करीत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी मसूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद नोंद करण्यात आलेला आहे. संबंधितांना आज कराड कोर्टात हजर करण्यात आल्याची माहिती एपीआय पंकज पवार, एफडीआयच्या अधिकारी वंदना रूपवनकर यांनी दिली आहे. संबंधित भेसळ करणारे दोघे हे पती-पत्नी आहेत. दुधाचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आलेले आहेत.
शेरे येथील मुलीने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या
नीट (NEET) परीक्षेत अपयश आल्याच्या नैराश्यातून कराड तालुक्यातील शेरे स्टेशन येथील १८ वर्षीय विद्यार्थिनीने विषारी औषध प्राशन करून जीवन संपविल्याची दुर्दैवी घटना घडली. उपचारासाठी कृष्णा रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर सोमवारी (दि. २७) तिचा मृत्यू झाला. समीक्षा दीपक पवार (वय १८, रा. शेरे स्टेशन, ता. कराड) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. गेल्या वर्षीची नीट परीक्षा तिने दिली होती. निकालात अपयश आल्याने ती मानसिक तणाव आणि नैराश्यात होती. त्याच अवस्थेत तिने २३ जुलै रोजी उंदरांना मारण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या विषारी वड्या खाल्ल्या. मात्र, ही बाब तिने सुरुवातीला घरातील कोणालाही सांगितली नव्हती.
दोन दिवसांनंतर विषाचा परिणाम शरीरावर होऊ लागल्याने तिला तीव्र पोटदुखीचा त्रास सुरू झाला. त्यावेळी तिने घडलेला प्रकार कुटुंबीयांना सांगितला. त्यानंतर नातेवाईकांनी तातडीने २६ जुलै रोजी तिला कराड येथील कृष्णा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचार सुरू असतानाच सोमवारी तिची प्राणज्योत मालवली. या घटनेमुळे शेरे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, स्पर्धा परीक्षांतील अपयशामुळे विद्यार्थ्यांवर वाढत असलेल्या मानसिक ताणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास मसूर पोलीस ठाण्याचे हवालदार सुनील पन्हाळे करीत आहेत.



