कराडचे वकीलसाहेब तुम्हीपण… राजकारणीच

विशाल पाटील
(हॅलो न्यूज) – दिल्लीत नीट परीक्षेतील गैरप्रकारावरून विद्यार्थी आंदोलनाला बसले आहेत. या आंदोलनाची धग देशातील मोठ्या शहरात नव्हे तर ग्रामीण भागातही पोहचली आहे. राजकीय पोळी भाजण्यासाठी राजकीय पक्ष तयार असतात. मात्र, न्यायव्यवस्था चालवणारी वकील यंत्रणेची भूमिका राजकीय केव्हापासून हा प्रश्न कराडमधील वकीलांच्या आंदोलनाने उपस्थित केला आहे. कराड येथील न्यायालया बाहेर विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आंदोलन करण्यात आले. यावेळी वकीलांनी निवडून दिलेले कराड बार असोसिएशनचे पदाधिकारी मंडळ आंदोलनापासून लांब राहीले. त्यामुळे वकीलसाहेब तुम्हीपण, राजकीय भूमिका घेवून केव्हापासून न्यायव्यवस्थेत यायला लागला असा सामान्य प्रश्न उपस्थित होत आहे.
कराड येथे बुधवारी सकाळी 11 वाजता वकीलांनी एका मिटींगचे आयोजन करून सर्वांना नोटीसा दिल्या होत्या. या वकीलांच्या मिटींगला मोठ्या संख्येने उपस्थिती राहत, मिटींग पार पडली. त्यानंतर दुपारी 1 वाजता कराडला अपर जिल्हा व सत्र न्यायालयाच्या प्रवेशद्वाराच्या बाहेर सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. तसेच केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. त्याचबरोबर एक दिवस कामकाज बंद ठेवत दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यात आला. यावेळी वकीलांची संख्या मोठ्या प्रमाणात होती.
या आंदोलनावेळी कराड बार असोसिएशनचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव व इतर पदाधिकारी अनुपस्थित राहीले होते. वकीलांच्या आंदोलनानंतर असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी एक नोटीस काढत दुपारी मिटींगचे आयोजन केले. परंतु, कोरम पूर्ण न झाल्याने पदाधिकाऱ्यांना दुपारची मिटींग रद्द करावी लागली. तेव्हा न्यायदेवतेपुढे व न्यायदेवतेच्या परिसरात तरी वकीलसाहेब राजकारण नको. नाहीतर तुम्हीपण…. राजकारणीच म्हणावे लागेल.
विद्यार्थी आंदोलनात राजकारण
कराडच्या वकीलांना एक मोठी परंपरा आहे. अनेकदा सामाजिक कार्यात येथील वकील योगदान देतात. मतभेद, मनभेद हे न्यायालयाच्या, न्यायदेवतेच्या कक्षेबाहेर ठेवलेले कराडकरांनी पाहीले आहे. कोणतीही राजकीय निवडणूक असो किंवा कार्यक्रम कधीच येथील वकीलांनी राजकारण केले नाही. मग, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर वकीलांचा आवाज म्हणून निवडून दिलेल्या पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यासाठी होणाऱ्या आंदोलनात राजकारण का म्हणून आणले असावे.



