आजोबाच्या डोळ्यासमोर कोयना नदीत 12 वर्षाच्या मुलाचा बुडून मृत्यू

कराड – साताऱ्यातील कोयना नदीत आपल्या वयोवृध्द आजोबा सोबत पोहण्यासाठी गेलेल्या एका 12 वर्षाच्या मुलचा बुडाल्याची घटना समोर आली असून मुलाचा मृत्यू झाला आहे. कराड तालुक्यातील सुपने गावातील आजोबा आपल्या नातवाला कोयना नदीत आज सकाळी पोहण्यासाठी घेवून गेले होते. तेव्हा ही दुर्घटना घडली. कोयना नदीत गेल्या सहा दिवसातील तिसरी घटना चाैघांचा मृत्यू झाला आहे.
सुपने – किरपे पुलाच्या दरम्यान वाहणाऱ्या कोयना नदीच्या पाण्याच्या पात्रात आज सकाळी नातू वरद शंकर कांबळे आपल्या आजोबासोबत पोहायला गेलेला होता. यावेळी आजोबा बंडू खाशाबा कांबळे नदीकाठाला बसून होते. यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने नातू पाण्यात बुडू लागला तेव्हा पुलावरून प्रवास करणाऱ्या एका व्यक्तीला मुलगा बुडत असल्याचे लक्षात आले. तेव्हा त्या व्यक्तीने मोठमोठ्याने आरडोअोरड केली. यावेळी नदीपात्रात पोहणाऱ्या तसेच शेजारी असणाऱ्या तरूणांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. मात्र, आजोबांच्या डोळ्यासमोर नातू बुडाला. काही वेळातच गावातील तरूणांनी नदीपात्रात शोधमोहिम राबविली.
या शोधकार्यात सुपने गावचे पोलिस पाटील कमलेश कोळी यांनी नदीत स्वतः उडी घेत शोधकार्यात सहभाग घेतला, तेव्हा त्यांना मुलगा सापडला. तसेच जमीर शाैकात, लखन पठाण, अमोल हंबीरराव पाटील यांनीही नदीत उड्या घेवून शोधकार्य केले. घटनेचा अधिक तपास कराड तालुका पोलिस करीत आहेत. सहा दिवसापूर्वी कोयना धरणाजवळ कोयना नदीत दोन सख्या चुलत भावांचा बुडून मृत्यू झाला होता. त्यानंतर दोन दिवसापूर्वी पाटण तालुक्यातील निसरे बंधारा येथे 12 वर्षाचा मुलाचा पोहताना मृत्यू झाला. तर आज कराड तालुक्यातील सुपने येथे 12 वर्षाचाच मुलाचा बुडून मृत्यू झाला आहे.



