Hello News 2026 Ganpati Arati Book
ताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रराज्यसातारा

भाजपाच्या नगरसेवकांचा बोंबाबोंब आंदोलनाचा इशारा : कराड शहरातील 45 रस्त्यांचे कामे रखडली

एसआयआर कॅम्प लावण्यावरून जोरदार वादंग

कराड :- कराड शहरातील 45 रस्त्यांना आमदार डाॅ. अतुल भोसले आणि महायुती सरकारच्या माध्यमातून कोट्यावधीचा निधी देण्यात आला असून वर्क आॅर्डर निघालेल्या असताना कामे होत नाहीत. तसेच शहरातील घनकचरा, ड्रेनेज व्यवस्था, रस्त्यांची कामे, कचरा गाड्यांकडे दुर्लक्ष होत असून शहरातील नागरिकांचे हाल होत असल्याने भारतीय जनता पक्षाचे सर्वच नगरसेवकांनी मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर यांना चांगलेच धारेवर धरले. येत्या आठवड्यात रस्त्यांच्या कामासोबत इतर प्रश्नावर तोडगा न निघाल्यास कराड पालिकेत बोंबाबोंब आंदोलन करण्याचा इशारा विरोधी पक्षनेते विजय वाटेगावकर यांच्यासह भाजपाच्या नगरसेवकांनी दिला आहे. या बैठकीला नगरसेवक शिवाजी पवार, अजय पावसकर, सुमित जाधव, गणेश पवार, वैष्णवी वायदंडे, आशुतोष डुबल, सुहास जगताप, सुरज माने, सचिन वास्के, अतुल शिंदे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

कराड शहरात बीपीसीएल गॅस पाईप लाईन तसेच एअरटेल मोबाईल कंपनीच्या केबल टाकण्याचे काम सुरू करायचे असल्याने गेल्या तीन महिन्यापूर्वी ठराव होवूनही कामास अजूनही विलंब होत असल्याने रस्त्यांचे काम सुरू न झाल्याने विरोधी पक्षनेते विजय वाटेगावकर आक्रमक झाले. स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका एसआयर कामा संदर्भात राजकीय नेत्यांना बीएलअो कॅम्प घेण्यास परवानगी नसताना. पालिकेतील काही पदाधिकाऱ्यांनी कोणत्या अधिकाराने कॅम्पचे आयोजन केले आहे. तेव्हा आम्हालाही असे कॅम्प आयोजित करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी भाजपचे पदाधिकारी अतुल शिंदे यांनी केली. त्यावर मुख्याधिकाऱ्यांनी कोणत्याही राजकीय नेत्यांना अशा पध्दतीने कॅम्प आयोजित करण्यास परवानगी नाही, असा कोणता कॅम्प आयोजित केला असेल तर तो बेकायदेशीर आहे.

प्रितीसंगम बागेत गाढव फिरण्याचा मुद्दा नगरसेवक अजय पावसकर यांनी उपस्थित केला. तसेच बागेत खाद्य खाण्यास मनाई असताना अनेकदा मंदिर परिसरात नाॅनव्हेज खाद्यपदार्थ खाण्यास नेण्यात येत आहे. तेव्हा त्यावर पूर्णपणे व्हेज असो की नाॅनव्हेज त्यावर बंदी आणण्याची मागणी केली.

कराड शहरातील तीन बागेत योग्य पध्दतीने व्यवस्था पाहिली जात नाही. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी गाढव फिरणे ही अत्यंत गंभीर बाब असून ठेकेदाराची बिल काढू नयेत, अशी एकमुखी मागणी भाजपाच्या नगरसेवकांनी केली आहे.

नगरसेवक आशुतोष डुबल यांनी शहरात मान्सूनपूर्व कामे होण्याची आवश्यकता असताना वृक्षांच्या धोकादायक फांद्या छाटण्यात आल्या नाहीत. तसेच ड्रेनेज स्वच्छता करण्यात आली नाही. तेव्हा प्रशासनाने या कामाकडे लक्ष द्यावे, अशी मागणी केली.

कराडच्या प्रितीसंगम बागेत नियमावली लावा
कराड शहरातील स्व. यशवंतराव चव्हाण समाधीस्थळावरील बागेत गाढव गेल्याने चार कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आल्याचे मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर यांनी सांगितले. यावर भाजपाच्या नगरसेवकांनी ठेकेदाराचे बिल काढू नये,अशी आक्रमक भूमिका घेतली. तसेच नगरसेवक सुहास जगताप यांनी प्रितीसंगम बागेत नियमावली तसेच पालिकेतील अधिकाऱ्यांचे मोबाईल नंबरचे बोर्ड लावावेत अशी मागणी केली.

बैलबाजार रोडसाठी 1 कोटी 57 लाखांचा निधी मंजूर तरी काम रखडले
कराड नगरपालिका हद्दीतील बैलबाजार रोड नोव्हेंबर 2025 महिन्यात मंजूर झाला. या रस्त्यासाठी 1 कोटी 57 लाखांचा निधी आमदार डाॅ. अतुल भोसले यांच्या माध्यमातून मिळाला. या कामांची वर्क आॅर्डर 8 एप्रिल 2026 रोजी मिळाली. यानंतर गॅसपाईप लाईन तसेच मोबाईल कंपनीच्या केबल टाकण्यासाठी आदेश आला. त्यामुळे या रस्त्याच्या गैरसोयीला जबाबदार कोण असा प्रश्न निर्माण होत आहे. तेव्हा मुख्याधिकाऱ्यांना आम्ही भेटून या त्रासातून मुक्तता व्हावी, अशी मागणी नगरसेवक शिवाजी पवार यांनी केली आहे.

गॅस पाईपलाईन आणि केबलला विलंब का?
कराड शहरातील बीपीसीएल गॅस पाईपलाईन तसेच एअरटेल कंपनीची केबल टाकण्यास विलंब का होत आहे, असा प्रश्न भाजपाच्या नगरसेवकांनी उपस्थित केला. तसेच नक्की कंपनी की अन्य कोणते कारण आहे. याबाबत कंपनीसोबत सर्व नगरसेवकांची बैठक लावण्याची मागणी यावेळी करण्यात आली. अद्याप कंपन्या कारणाने की कोणाच्या दबावाने हे काम रखडून कराड शहराला वेठीस धरत आहेत,यांचा जाब आम्हाला विचारावा लागेल. त्यासाठी येत्या आठवड्यात कंपनीसोबत बैठक लावावी अन्यथा बोंबाबोंब आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close