सातारा जिल्ह्याला पृथ्वीराज बाबांसारखे नेतृत्व लाभले, ही जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब :- खा. विशाल पाटील
काॅंग्रेसचे जिल्हाध्यक्ष नामदेव पाटील यांनी घेतली खा. विशाल पाटलांची सदिच्छा भेट

कराड :- “सातारा जिल्ह्याला पृथ्वीराज बाबांसारखे अभ्यासू, स्वच्छ प्रतिमेचे आणि दूरदृष्टी असलेले नेतृत्व लाभले, ही जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब आहे. काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता देशात कुठेही गेला तरी अभिमानाने पृथ्वीराज बाबांचे नाव घेऊ शकतो. त्यांच्या विद्वत्तेला आणि प्रशासकीय अनुभवाला खऱ्या अर्थाने तोड नसल्याचे गाैरवोद्गार काॅंग्रेसचे सांगलीचे खासदार विशाल पाटील यांनी काढले.
सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष नामदेवराव पाटील यांनी काँग्रेस पक्षाचे सहयोगी खासदार विशाल पाटील यांची त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. त्यानंतर काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी विधानपरिषद सदस्य मोहनरावदादा कदम यांचीही सदिच्छा भेट घेऊन आशीर्वाद घेतले. नव्या जबाबदारीबद्दल मोहनरावदादा कदम यांनी त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अजितराव पाटील- चिखलीकर, मुकेश मोहिते उपस्थित होते. यावेळी झालेल्या मनमोकळ्या संवादात खासदार विशाल पाटील यांनी सातारा जिल्ह्याला लाभलेल्या माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाचा गौरव केला.

खासदार विशाल पाटील म्हणाले, नामदेव पाटील आप्पा तुम्ही पृथ्वीराज बाबांच्या सातारा जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आहात. त्यामुळे काँग्रेसची विचारधारा, पक्षाची मूल्ये आणि जनहिताचा दृष्टिकोन कायम जपण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे. काँग्रेस पक्षाने देश आणि राज्याच्या विकासासाठी केलेली ऐतिहासिक कामे जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचली पाहिजेत.



