‘फालतू’ शब्दावरून कराड पालिकेच्या सभेत गोंधळ उडाला
नगरपालिकेची मासिक सभा वादळी ठरली

कराड :- कराड पालिकेच्या सभेत घनकचरा प्रकल्पाची चर्चा सुरू असताना नगसेवक अल्ताफ शिकलगार यांनी फालतू विषयावरील चर्चा थांबवा असे म्हटल्याने सभागृहात सत्ताधारी आणि विरोधकांच्यात मोठा गोंधळ पहायला मिळाला. शहरातील लोकांच्या आरोग्याशी संबधित विषयाला फालतू म्हटल्याचा आरोप विरोधकांनी शब्द मागे घेण्याची मागणी केली. अखेर नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांनी गोंधळ घालणाऱ्या नगरसेवकांना निलंबनांची कारवाईचा इशारा दिल्याने सभागृह शांत झाले.
कराड शहरातील महत्वाच्या असलेल्या विषयांवर मंगळवारी घेण्यात आलेली नगरपालिकेची मासिक सभा चांगलीच वादळी ठरली. रस्त्यांची रूंदी, घनकचरा प्रकल्प, खासगी कंपन्यांची पाईप लाईन आदी विषयावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली. यावेळी कराड शहरातून प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत जेष्ठ नेते यशवंतराव चव्हाण स्मृतीस्थळ परिसरातून शहराच्या लगतहून जाणारा नेकलेस रस्ता आणि मंगळवार पेठेतील मोकळ्या भूखंडात एक कोटी वीस लाखांचा बगीचा विकसित करणे असे महत्वाचे दोन ठराव पालिकेच्या सभेत तहकूब करण्यात आले.
कराड पालिकेच्या सभागृहात मंगळवारी सर्वसाधारण सभा नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव याच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी उपनगराध्यक्ष पोपटराव साळुंखे यांच्यासह सर्व नगरसेवक, नगरसेविका यांची उपस्थिती होती. यावेळी भाजपच्या नगरसेवकांनी नेकलेस रोडला विरोध होण्यामागचे कारण विचारत सत्ताधार्यांवर आरोप केले. तसेच पालिकेला बांधकाम विभागाने पत्र देवूनही प्रेझेंटेशन करिता संबधितांना वेळ न दिल्याने मुख्याधिकाऱ्यांना जाब विचारला. तसेच विरोधी पक्षनेते विजय वाटेगावकर यांनी त्याबाबतचा खुलासा मागितला. यावेळी सत्ताधारी आणि विरोधी गटांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक उडाली. नेकलेस रस्ता आणि पर्यटन विकास काय होणार? याबाबत कोणताही खुलासा अधिकृत शासकीय विभागाकडून झालेला नाही. पालिकेने वारंवार मागणी करूनही त्याचे प्रेझेंटेशन दिले नसल्यामुळे हा ठराव तहकूब करण्यात येत असल्याचे नगराध्यक्ष यादव यांनी सांगितले.
विरोधी पक्ष नेते वाटेगावकर यांनी आमदारांनी निधी दिलेले प्रकल्प करायचे नाहीत. निधी वापरायचेच नाही असं काही ठरलं आहे का? असा प्रश्न उपस्थित केल्यानंतर पुन्हा सत्ताधारी आणि विरोधी गटांमध्ये जोरदार चकमक उडाली. यावेळी सत्ताधारी गटातील विजयसिंह यादव, अख्तर आंबेकरी, जयंत पाटील, प्रवीण पवार, सुहास पवार यांनी चर्चेत सहभाग घेतला. नगराध्यक्ष यादव यांनी त्यात तोडगा काढत हा साडेसहा कोटींचा प्रकल्प आहे. हा संवेदनशील विषय असल्यामुळे आपण तो सध्या तहकूब करत आहोत असे सांगितले. यावर भाजपच्या नगरसेवकांनी याला आमची मंजुरी आहे असे स्पष्ट केले. सत्ताधारी गटाच्या कडून विषय तहकूब करण्यात आला.
सोमवार पेठेमध्ये रस्ता कमी करण्यावरून ही जोरदार चर्चा झाली भाजपचे नगरसेवक अजय पावसकर यांनी तो विषय मांडला. त्यावेळी लोकांची घरे त्या रस्त्यात जात आहेत. त्यामुळे ती घरे जाऊ नये यासाठी रस्त्याची रुंदी कमी करावी अशी मागणी त्यांनी केली. नगराध्यक्षांनी या रस्त्यांचा अभ्यास करून अधिकार्यांनी अहवाल द्यावा, अशा सूचना अधिकार्यांना दिल्या.



