
विशाल पाटील – हॅलो न्यूज
महाराष्ट्राचा मंगल कलश आणणारे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या भूमीत एक धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. चक्क मतदानाचा अधिकार देण्यासाठी पैशाची बोली लावण्याचा प्रकार कराड तालुक्यातील कोडोली गावातील विकास सेवा सोसायटीच्या ठरावा दरम्यान घडला आहे. लोकशाहीचा लिलाव करण्याची ही प्रक्रिया केल्याने सहकार मोडीत काढण्याचा डावच म्हणावा लागेल. राज्यात, केंद्रात आजपर्यंत खोक्या, पेटीची चर्चा होती, स्थानिक राजकारणही पैशात मांडला जावू लागला आहे.
सातारा जिल्हा बँकेची निवडणूक येत्या काही दिवसात होणार असून त्याकरता 5 ऑगस्ट पर्यंत विकास सेवा सोसायटी यांनी मतदानाचा अधिकार देण्यासाठी ठराव द्यावयाचा आहे. हा ठराव देण्यासाठी सातारा जिल्ह्यात मोठे राजकारण सुरू असून यामध्ये अनेक ठिकाणी मारामारी, पोलीस केस झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. कराड तालुक्यातील मालखेड येथे मारामारीची घटना घडली. त्यानंतर जावली तालुक्यात बांधकाम मंत्री यांच्या उपस्थित ठरावावरून राडा झाला. तर जिल्ह्यात वेगवेगळे मार्ग अवलंबले जात आहेत. मात्र, यशवंत विचाराची परंपरा असलेल्या कराड तालुक्यात आजपर्यंत यशवंतराव मोहीते (भाऊ), लोकनेते बाळासाहेब देसाई, माजी सहकार मंत्री विलासराव पाटील- उंडाळकर (काका), जयवंतराव भोसले (आप्पा), पी. डी. पाटील साहेब, माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (बाबा) यांची परंपरा असलेल्या मतदार संघात चक्क लोकशाहीचा गळा घोटणारी प्रक्रिया सहकार क्षेत्रात पाहायला मिळाली. सुरूवात 70 हजारापासून झालेली बोली दोन लाख रुपयांनी मताचा अधिकार विकला गेला.
लोकशाहीचा खून अन् बाजारात मांडलेल्या भाजी प्रमाणेच नव्हे तर एकाद्या रखेल प्रमाणे मतांचा अधिकार विकणाऱ्यांना आणि घेणाऱ्यांना सहकार माहीत आहे का हा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतो. खरे तर सहकार क्षेत्रातील अधिकारी (निंबधक) यांनी ही प्रक्रिया रद्द करणे गरजेचे आहे. तसेच या सोसायटीचे प्रभुत्व असणारे नेते कोणता विचार पुढे नेत आहेत, हा प्रश्न समाज विचारलाशिवाय राहणार नाही. तेव्हा नेत्यांनी या मतांच्या अधिकारांचा बाजार मांडणाऱ्या बाजारबुणग्यांना समज द्यावी. अन्यथा यशवंत विचारांना तिलाजंली दिली जाईल.
पैशाची स्टंटबाजी …
कोडोली सोसायटीत एकाच गटाची, पक्षाची सत्ता असताना जिरवाजीरवीचे राजकारण पहायला मिळत आहे. आपण लिलावाने, पैशाने मताचा अधिकार मिळवला. आपला विजय झाला अशा पध्दतीने संबधित प्रकार स्टंटबाजी करत व्हायरल केला जात आहे. तसेच हा सर्व स्टंट बरोबरच आहे. आम्ही केले ते योग्यच अशा पध्दतीने संचालक मंडळातील काही महाभाग मिरवत आहेत. तेव्हा पैशाची स्टंटबाजी अन् लोकशाहीचा लिलाव करणाऱ्यांना लोकशाही म्हणजे काय हे माहीती करून देणं गरजेचे आहे.
कोडोली नक्की काय घडलं
कोडोली ग्रामविकास सेवा सोसायटीची संचालक मंडळ मीटिंग सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीच्या ठरावा संदर्भात आयोजित केली होती. या मीटिंगमध्ये संस्थेला भरघोस पैसे देणाऱ्या सभासदाच्या नावे ठराव देण्याचा निर्णय संचालक मंडळांनी घेतला होता. या अनुषंगाने या ठरावाच्या संदर्भात लिलाव पद्धतीने ठराव पूर्ण झाला यामध्ये आनंदराव जगताप यांनी आपली बोली 1 लाख रुपयांनी सुरू केली. शेवट हा विक्रमसिंह संभाजीराव जगताप यांनी दोन लाख रुपयांची बोली लावून मताचा अधिकार मिळवला. लोकशाहीत असा प्रकार राज्यात पहिल्यांदाच घडला आणि तो ही यशवंत विचारांची भूमी म्हणून मिरवणाऱ्या कराड तालुक्यात.



