Shekar Patil Maqheshwari Infra 1
ताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रब्रेकिंगराजकियराज्यसातारा

कराड पालिकेवर काॅंग्रेसचा गंभीर आरोप : माजी सहकार मंत्र्यांच्या वाढदिवसासाठी ठराव बदलला

काँग्रेसचे अल्पसंख्यांक विभागाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष झाकीर पठाण यांची टीका

कराड  : – कराड शहराचे विद्रूपीकरण रोखण्यासाठी कराड नगरपालिकेने फ्लेक्स बोर्ड लावण्यास बंदीचा ठराव असताना माजी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या वाढदिवसासाठी हा ठराव बदलण्यात आल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे अल्पसंख्यांक विभागाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष झाकीर पठाण यांनी केला. राजकीय व्यक्तींच्या वाढदिवसासाठी नियम बदलले जात असतील, तर पालिका प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण होते, अशी टीकाही त्यांनी केली. शासकीय विश्रामगृहात काँग्रेसच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी कराड शहर काँग्रेसचे अध्यक्ष अॅड. अमित जाधव, भीमशक्तीचे जिल्हाध्यक्ष आनंदराव लादे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

झाकीर पठाण म्हणाले, शहरात फ्लेक्स बोर्ड लावण्यासाठी पालिकेची रीतसर परवानगी घेतली जात नाही. कमी आकाराच्या फ्लेक्ससाठी परवानगी घेऊन प्रत्यक्षात मोठे फ्लेक्स लावले जातात. परवानगीची मुदत एक दिवसाची असतानाही अनेक फ्लेक्स चार-पाच दिवस कायम ठेवले जातात. त्यामुळे शहराचे विद्रूपीकरण होण्याबरोबरच पालिकेचा महसूलही बुडत आहे. फ्लेक्स बोर्डच्या परवानगीसाठी पालिकेकडे किती अर्ज आले, याची माहिती मुख्याधिकाऱ्यांकडे मागितली होती. मात्र, असे अर्जच प्राप्त झाले नसल्याचे त्यांनी सांगितल्याचा दावा पठाण यांनी केला. मग शहरातील फ्लेक्स कोणाच्या परवानगीने लावले जातात, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. यापूर्वी काही नगरसेवकांनी नियमबाह्य फ्लेक्स लावल्याची तक्रार करून संबंधितांवर अपात्रतेची कारवाई करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर यांना लेखी आदेश दिले. मात्र, या आदेशांची अंमलबजावणी करण्यात आली नसल्याचा आरोप पठाण यांनी केला. संबंधितांना कोणाचा राजकीय वरदहस्त आहे, असा सवाल करत कारवाई न झाल्यास १५ ऑगस्ट रोजी आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला. तसेच शहरातील विविध इमारतींवर मोठमोठे होर्डिंग्ज उभारण्यात आले आहेत. त्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट करावे, अशी मागणी पठाण यांनी यावेळी केली.

भ्रष्टाचार…भ्रष्टाचार
शहरातील नागरिकांनी विकासाच्या अपेक्षेने नगरपालिकेत सत्ताधाऱ्यांना निवडून दिले असताना सत्ताधारी आणि विरोधक मात्र आरोप-प्रत्यारोपांच्या राजकारणात व्यस्त आहेत. 2021 पासून नगरपालिकेत प्रशासक असताना मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत पठाण यांनी बाराडबरी येथील उद्यानाच्या कामाचा मुद्दा उपस्थित केला. भाजपने याप्रकरणी आरोप करण्यापूर्वीच आपण या कामात सुमारे एक कोटी आठ लाखांचा गैरव्यवहार झाल्याचे निदर्शनास आणल्याचे त्यांनी सांगितले. सीएसआर निधीतून झाडे लावण्यात आली असतील. पण ‘माझी वसुंधरा’ अभियानातून स्वतंत्र गार्डन उभारल्याचे दाखविण्यात आले; मात्र प्रत्यक्षात तेथे गार्डन अस्तित्वात नसून गार्डनच चोरीला गेल्याचा आरोप त्यांनी केला. सोलर पॅनलच्या कामातही गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत तत्कालीन मुख्याधिकारी शंकर खंदारे आणि आरोग्य विभागातील श्री. काकडे यांच्या कामाची चौकशी करण्याची मागणी पठाण यांनी केली.

तसेच सध्या सत्ताधारी यशवंत विकास आघाडी, लोकशाही आघाडी आणि विरोधी भाजप एकमेकांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत असतील, तर सर्व प्रकरणांची ईडीमार्फत चौकशी करण्याचा ठराव पालिकेने घ्यावा, असे आव्हानही त्यांनी दिले. वाढीव भागात संविधान भवन व उर्दू शाळा उभारण्याच्या प्रस्तावावरही त्यांनी आक्षेप घेतला. घनकचरा प्रकल्पाच्या परिसरातून रस्ता नेण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत, कचरा डेपोच्या जवळ शाळा उभारल्यास विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असे त्यांनी सांगितले. भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणीही त्यांनी केली.

300 कोटींच्या निधीची फक्त बॅनरबाजी?
नगरपालिकेतील सत्ताधारी यशवंत विकास आघाडी व लोकशाही आघाडी, तसेच विरोधी भाजपमध्ये सध्या श्रेयवादाचे राजकारण सुरू आहे. नागरिकांनी विकासासाठी निवडून दिले असताना, त्यांनाच वेठीस धरले जात असल्याचा आरोप आनंदराव लादे यांनी केला. शिवाजी स्टेडियमचे बांधकाम सुरू असल्याने खेळाडूंना पर्यायी मैदान उपलब्ध नसल्याने त्यांचे मोठे नुकसान होत आहे. नगरपालिकेत भ्रष्टाचार सुरू असल्याचा आरोप करत, निवडणुकीपूर्वी ३०० कोटींचा निधी आणल्याची बॅनरबाजी करण्यात आली; मात्र त्यातून प्रत्यक्ष विकासकामे कुठेही दिसत नसल्याचे लादे यांनी नमूद केले. शहरात घरकुलासाठी शासन अडीच लाख रुपये अनुदान देत असताना, मुतारी बांधण्यासाठी सहा लाखांचा खर्च दाखविला जातो. ही भ्रष्टाचाराची उदाहरणे असल्याचा आरोपही त्यांनी केला.

अतिक्रमणांबाबत दुजाभाव
बैल बाजार रोडची दयनीय अवस्था झाली असून, खड्ड्यांमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. या मार्गावर किरकोळ, तसेच गंभीर अपघात झाले असून, पालिकेकडे वारंवार मागणी करूनही रस्त्याच्या सुधारणेकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप अॅड. अमित जाधव यांनी केला. पालिकेने हटविलेली अतिक्रमणे पुन्हा उभी राहत असून, गोरगरीबांच्या उपजीविकेवर कारवाई करताना धनदांडग्यांना अभय दिले जात असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केली.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close