पालकमंत्री पत्रकार परिषद : शरद पवारांची भेट, महायुतीतील भूमिका, मराठा आरक्षण अन् शिवसेनेच्या भवितव्यापासून कराडच्या उड्डाणपुलापर्यंत…

कराड (हॅलो न्यूज) :- शरद पवारांची भेट, महायुतीतील भूमिका, मराठा आरक्षण आणि शिवसेनेच्या भवितव्यापासून कराडच्या उड्डाणपुलापर्यंत… शिवसेना नेते आणि मंत्री शंभूराज देसाई यांनी आज विविध विषयांवर आपली भूमिका कराड येथे औपचारिक बोलताना स्पष्ट केली आहे. शरद पवारांची भेट ही केवळ सदिच्छा भेट होती, त्यामध्ये कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचं देसाईंनी स्पष्ट केलं. तर महायुतीबाबत वरिष्ठ नेते जो निर्णय घेतील, तो शिवसेना पाळेल, असंही त्यांनी सांगितलं.
मनोज जरांगे पाटील यांनी शंभूराज देसाई आणि उदय सामंत यांच्यावर व्यक्त केलेल्या विश्वासाबद्दल देसाईंनी आभार मानले असून, मराठा समाजासाठी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सकारात्मक काम सुरू असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. कुणबी नोंदींच्या पडताळणीवरून ओबीसी आणि मराठा समाजामध्ये गैरसमज निर्माण होऊ नयेत, अशी सरकारची भूमिका असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
दरम्यान, शिवसेनेच्या निकालाबाबत संजय राऊत यांच्या दाव्यांवर देसाईंनी जोरदार टीका केली आहे. “राऊत जे बोलतात ते कधीही खरं होत नाही,” असा टोला लगावत न्यायालयातील युक्तिवाद अद्याप पूर्ण झालेला नसल्याचं त्यांनी म्हटलं. तर शिवसेनेत प्रवेशाची प्रक्रिया सुरूच राहणार असल्याचे संकेतही त्यांनी दिले आहेत.
यासोबतच कराडच्या उड्डाणपुलाच्या सुरक्षेवरही शंभूराज देसाईंनी प्रश्न उपस्थित केला. लाईटची व्यवस्था नसताना आणि काम पूर्ण झालेलं नसताना उड्डाणपूल वाहतुकीसाठी सुरू करण्याची घाई का? असा सवाल करत, NHAIचा सुरक्षा आणि फिजिबिलिटी अहवाल आल्यानंतरच पूल पूर्णपणे वाहतुकीसाठी खुला करायला हवा होता, अशी भूमिका त्यांनी मांडली.
शरद पवारांच्या भेटीबाबत
लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्यावरील ‘दौलत’ हा चरित्रग्रंथ शरद पवारांना भेट द्यायचा होता.
पवारांचा निरोप आल्यानंतर वेळ घेऊन केवळ सदिच्छा भेट घेतली.
या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही, असं शंभूराज देसाईंनी स्पष्ट केलं.
महायुतीबाबत भूमिका
आम्ही महायुतीमध्येच आहोत.
महायुतीबाबत वरिष्ठ नेते जो निर्णय घेतील, तो शिवसेना पाळेल.
मात्र सर्व राजकीय चर्चा उघडपणे सांगता येत नाहीत, असं देसाईंनी म्हटलं.
काही जखमा वरून भरल्यासारख्या दिसतात
भूतकाळात एखादी गोष्ट घडली म्हणून दरवेळी तसंच घडेल असं नाही.
काही जखमा वरून भरल्यासारख्या दिसतात.
मात्र आम्ही कधीही ‘परतफेड’ किंवा ‘सूड’ याची भाषा बोलणार नाही.
मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केलेल्या विश्वासाबाबत
मनोज जरांगे पाटील यांनी शंभूराज देसाई आणि उदय सामंत यांच्यावर विश्वास असल्याचं जाहीरपणे सांगितलं.
त्यावर देसाई म्हणाले, “मी जर तिथे असतो तर नक्कीच त्यांना भेटलो असतो.”
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना मराठा आरक्षणाबाबत जे सकारात्मक निर्णय झाले, त्यामध्ये समन्वय राखण्याची जबाबदारी उदय सामंत आणि माझ्यावर होती.
जरांगे पाटील यांनी व्यक्त केलेल्या भावनांबद्दल त्यांनी मनापासून आभार मानले.
मराठा समाजासाठी जे जे चांगलं करता येईल, ते शिंदे यांच्या नेतृत्वाखाली केलं जात असल्याचं देसाईंनी सांगितलं.
जरांगेचे स्वागत बॅंनर फाडण्याच्या प्रकाराबाबत
याप्रकरणी उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना तात्काळ निर्देश देण्यात आले आहेत.
परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येणार.
इतर माहितीही गोळा केली जाणार.
बॅनर फाडणाऱ्यांची ओळख पटल्यास कठोर कारवाई केली जाईल.
मराठा आरक्षण आणि कुणबी नोंदींबाबत
कुणबी नोंदी शोधण्यासाठी न्यायमूर्ती शिंदे समिती स्थापन करून पारदर्शक प्रक्रिया राबवण्यात आली आहे.
“कुणाच्याही ताटातलं काढून दुसऱ्याला देण्याचा सरकारचा हेतू नाही,” अशी भूमिका.
ओबीसी समाजाचा हक्क ओबीसींकडे आणि मराठा समाजाचा हक्क मराठा समाजाकडे राहील.
कोणत्याही समाजामध्ये गैरसमज निर्माण होऊ नयेत, याची काळजी घेतली जाईल.
मनोज जरांगे पाटील यांच्यासोबतचे गैरसमज भेटून किंवा चर्चेतून दूर केले जातील.
शिवसेनेच्या निकालाबाबत संजय राऊतांच्या दाव्यावर
संजय राऊत यांच्या वक्तव्यावर शंभूराज देसाईंची जोरदार टीका.
“संजय राऊत जे बोलतात, ते कधीही खरं होत नाही,” असा टोला.
त्यांच्या मागील अनेक वक्तव्यांचा संदर्भ देत त्यांचे दावे हवेतच राहतात, अशी टीका.
कपिल सिब्बल यांनी केलेला युक्तिवाद हा केवळ न्यायालयासमोरील Argument आहे.
अजून दुसऱ्या बाजूचा युक्तिवाद होणे बाकी आहे.
त्यानंतर न्यायालयाचा निकाल येईल.
“अजून सिनेमाचा ट्रेलर किंवा टायटलही पडलेलं नाही; पिक्चरचा बराच भाग आणि मध्यंतर बाकी आहे,” अशी मिश्कील टिप्पणी.
एकनाथ शिंदे यांची पंतप्रधानांसोबत भेट
शिवसेनेचे नवीन खासदार सोबत घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधानांची भेट घेतली.
दिल्ली दौऱ्यात पंतप्रधानांकडून वेळ मिळाल्यास राज्याच्या प्रश्नांसाठी भेट होत असते.
शिवसेना हा NDAचा प्रमुख घटक पक्ष आहे.
NDAच्या प्रमुख नेत्याला अधिवेशनाच्या काळात भेटणे हा शिष्टाचार आणि प्रोटोकॉलचा भाग असल्याचं देसाईंनी सांगितलं.
शिवसेनेत आणखी पक्षप्रवेश होणार का?
खासदारांनंतर आता पुन्हा कोण
“ही प्रक्रिया सुरूच राहणार आहे, ती थांबत नसते.”
कराड उड्डाणपुलावर लाईट नसताना वाहतूक सुरू केली.
अधिकृत उद्घाटनापूर्वीच उड्डाणपूल सुरू करण्याची घाई…
पुलाचं काम सर्व बाजूंनी पूर्ण झालेलं नाही.
रात्रीच्या वेळी पुलावर लाईट्स सुरू नसल्याने सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो.
NHAIचा फिजिबिलिटी आणि सुरक्षा तपासणी अहवाल येणे आवश्यक असल्याची भूमिका.
२४ तास वाहतुकीसाठी पूल पूर्णपणे सुरक्षित असल्याचा अहवाल आल्यानंतरच तो प्रवाशांसाठी खुला करायला हवा होता.



