पवनचक्कीची केबल चोरी करणार्या टोळीला अटक : कराड, पाटणच्या चाैघांसह 6 जणांना अटक
पाटण पोलिसांची जोरदार कामगिरी

पाटण :- सडावाघापूर व काठी येथील पठारावरील पवनचक्कीच्या तांब्याच्या केबल चोरी करणार्या टोळीचा पाटण पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या टोळीतील 6 जणांना पोलिसांनी अटक करून त्यांच्याकडून तांब्याच्या केबलसह चारचाकी गाडी असा तब्बल 9 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याप्रकरणी सर्व संशयित आरोपींना पाटण न्यायलासमोर हजर केले असता त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असल्याची माहिती पाटण पोलिसांनी दिली आहे.
पाटण तालुक्यातील सडावाघापूर व काठी, ता. पाटण येथील पठारावर मोठ्या प्रमाणावर पवनचक्क्याा असून सदर पवनचक्कीतील तांब्याची तार असलेल्या केबल चोरीचे प्रमाण हे गेल्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणावर वाढलेले होते. सदर चोरीच्या तक्रारी या पाटण पोलीस ठाण्यात दाखल झाल्याने पोलीस ठाण्यात गुन्हे नोंद करण्यात आलेले होते. सदरच्या चोरी या डोगरपठारावर, निर्मनुष्य असलेल्या ठिकाणी व रात्रीच्या वेळी होत असल्याने चोरांना पकडण्याचे आव्हान आव्हान पोलिसांसमोर होते.
पोलिसांना मिळालेल्या गोपनीय व तांत्रिक माहितीच्या आधारे कौशल्यपुर्वक तपास करुन सदर गुन्हे उघडकीस आणण्यात पाटण पोलिसांना यश आले आहे. तांब्याच्या तारा चोरीप्रकरणी रुपेश दिलीप पाटील (रा. पोतले, ता. कराड जि. सातारा), राहूल दादासाहेब कदम (रा. वडगाव ता. कराड), अनिल यशवंत सुतार (रा. सुतारवाडी, सणबुर, ता. पाटण), बबन बापू कस्तुरे व कृष्णात धोंडीराम गावडे (दोघे रा. महालक्ष्मीनगर, तिसरी गल्ली कदमवाडी, ताराबाई पार्क, कोल्हापूर ता. करवीर जि. कोल्हापूर), संतोष शामराव सरगर (रा. पाण्याच्या टाकीजवळ, चिखली, ता. कराड जि. सातारा) या 6 जणांच्या टोळीला पाटण पोलिसांनी शिथाफीने अटक केली. पाटण तालुक्यातील सडावाघापूर, सडादाढोली येथील पवनचक्कीतील चोरी केलेली तांब्याच्या केबलसह छोटाहत्ती चारचाकी गाडी आदी 9 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. या सर्व संशयित आरोपींना पाटण न्यायालयासमोर हजर केले असता सर्वांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
सदरची कामगिरी सातारा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधिक्षक श्रीमती वैशाली कडुकर, उपविभागीय पोलीस अधिकारी पाटण विभाग सुदाम पाचोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पाटण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नीलेश तारु, पोलीस उपनिरीक्षक बिपीन चव्हाण, राजेंद्र सदगर, संजय राऊत, आनंदा आव्हाड, पोलीस हवालदार वैभव पुजारी, उमेश गोरे, अमृत आळंदे, दादासाहेब लोंढे, आबासाहेब गलांडे, संतोष माने, संतोष कुचेकर, शरद गुरव, राजेंद्र मोहिते, हणमंत नलवडे, केतन नाकाडे, आशिष कांबळे, मच्छिद्र जाधव यांनी केलेली आहे.



