Hello News 2026 Ganpati Arati Book
क्राइमताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रसातारा

कराड बसस्थानक परिसरात गांजासह दोघांना अटक

कराड :- कराड शहरातील बसस्थानक परिसरात रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत गांजाची विक्री करणाऱ्या दोघांच्या कराड शहर पोलिसांनी मुसक्या आवळल्या. गांजाची विक्री करण्यासाठी आलेल्या संशयितांना पोलिसांनी रंगेहाथ पकडत त्यांच्या ताब्यातून १ किलो ३८० ग्रॅम गांजासह दुचाकी व तीन मोबाईल असा सुमारे १ लाख ७९ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची कारवाई मंगळवारी रात्री सव्वाअकरा वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी केली.

यासीर कादर शिकलगार (वय २३, रा. मंगळवार पेठ, कराड) आणि साथीदार आकाश राजू वाघमारे (वय २६, रा. शनिवार पेठ, कराड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, मंगळवारी (दि.२५) रोजी रात्री साडेआठच्या सुमारास कराड बसस्थानक परिसरात दोन इसम गांजा विक्रीसाठी येणार असल्याची गोपनीय माहिती कराड शहर पोलिसांना मिळाली. प्रभारी अधिकारी पोलिस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांनी माहितीची गांभीर्याने दखल घेत वरिष्ठांच्या परवानगीने तातडीने पथक तयार केले. पोलिसांनी बसस्थानक परिसरातील सहारा लॉजजवळ सापळा रचला. रात्री सव्वाअकराच्या सुमारास दोन संशयित मोटारसायकलवरून गांजा विक्री करताना पोलिसांच्या नजरेस पडले.

पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता छापा टाकत दोघांना तपासकामी अटक करत त्यांच्यावर कराड शहर पोलिस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही संशयितांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक दीपक वाघमारे करीत आहेत. पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलिस अधीक्षक वैशाली कडकर आणि उपविभागीय पोलिस अधिकारी राजश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक दत्तात्रय दराडे, सहायक पोलिस निरीक्षक विजय गोडसे, पोलिस उपनिरीक्षक डिसले, पोलिस उपनिरीक्षक वाघमारे यांच्यासह पथकाने ही धडक कारवाई केली.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close