राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) गटाला मोठा धक्का : किवळमधील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश
कराड उत्तरेच्या प्रत्येक गावाला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी कटिबद्ध ; आमदार मनोज घोरपडे

मसूर (हॅलो न्यूज):- राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे कराड उत्तर प्रसिद्धीप्रमुख तथा नवजीनाथ देवस्थान समितीचे सचिव रामराव साळुंखे यांच्यासह सोसायटीचे संचालक संतोष साळुंखे आणि अभय साळुंखे यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. दीर्घकाळ पक्षासाठी निष्ठापूर्वक काम करूनही सातत्याने झालेली उपेक्षा आणि कार्यकर्त्यांच्या प्रश्नांकडे झालेले दुर्लक्ष यामुळे हा निर्णय घेतल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. “आम्ही आयुष्यभर फक्त पक्षाचे झेंडेच नाचवायचे आणि सतरंज्याच उचलायच्या का? कोणाच्या ताटाखालचे मांजर बनून जगणे माझ्या रक्तात नाही,” अशा कडक शब्दांत रामराव साळुंखे यांनी आपल्या भावना व्यक्त करत स्वाभिमानासाठी भाजपचा मार्ग निवडल्याचे स्पष्ट केले. या पक्षप्रवेशामुळे किवळ आणि परिसरात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाला मोठा धक्का बसला असून, आगामी काळात किवळमध्ये भाजपची ताकद अधिक मजबूत होणार असल्याचे मानले जात आहे.

मौजे किवळ (ता. कराड) येथे विविध विकासकामांचा उद्घाटन व भूमिपूजन सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला यावेळी ते बोलत होते.याप्रसंगी पंचायत समिती सदस्य डॉ. संतोष पाटील, पं. स. सदस्या कोमल यादव, संतोष वेताळ, सातारा जिल्हा भारतीय जनता पार्टी सरचिटणीस गणेश जाधव, वामनराव साळुंखे , नवजीनाथ देवस्थान समितीचे सचिव रामराव साळुंखे, कराड उत्तर भाजपा विधानसभा प्रमुख अभियंता आघाडी सागर साळुंखे , प्रशांत घोलप , विजय मोरे,सागर जगदाळे, संदीप सावंत, मारुती घोलप,नवीन कवठे सरपंच गणेश घार्गे,पै. दिपक जाधव , सुनील जाधव, पै. संभाजी पाटील ,श्रीकांत पाटील, अमोल साळुंखे तसेच गावातील ग्रामस्थ महिला भाजपाचे सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
किवळ गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असणाऱ्या मूलभूत सुविधा, रस्ते, पाणी, सार्वजनिक सुविधा आणि नागरिकांच्या गरजा यांना प्राधान्य देत विकासाची कामे केवळ कागदावर न ठेवता ती प्रत्यक्षात आणण्याचा संकल्प आज पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.किवळच्या विकासाचा हा प्रवास असाच अविरत सुरू राहणार असून, कराड उत्तरच्या प्रत्येक गावाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मी कटिबद्ध आहोत असे प्रतिपादन आमदार मनोज घोरपडे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाजप अभियंता आघाडी संयोजक सागर साळुंखे यांनी केले. सूत्रसंचालन आशिष मोहिते तर आभार किसन पावशे यांनी मानले.



