प्रवरा विद्यापीठाकडून डॉ. सुरेश भोसले यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान
वैद्यकीय सेवा, शिक्षण, संशोधन, सहकार आणि ग्रामीण विकासातील प्रदीर्घ योगदानाची दखल

कराड (हॅलो न्यूज) :- कृष्णा विश्व विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले यांना त्यांच्या वैद्यकीय, शैक्षणिक, संशोधन, सामाजिक आणि संस्थात्मक क्षेत्रातील प्रदीर्घ व उल्लेखनीय योगदानाबद्दल अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रवरा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस अभिमत विद्यापीठाच्यावतीने जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. विद्यापीठाच्या २३ व्या वर्धापनदिनानिमित्त लोणी येथे आयोजित सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
लोणी येथील प्रवरा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसच्या पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे-पाटील कॉम्प्लेक्समध्ये संस्थेच्या २३ व्या वर्धापनदिन सोहळ्यानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. व्यासपीठावर केमिकल टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूटचे माजी संचालक पद्मविभूषण प्रा. मनमोहन शर्मा, कुलगुरु प्रा. अनिरुद्ध पंडित, प्रवरा विद्यापीठाचे कुलपती डॉ. राजेंद्र विखे-पाटील, कुलगुरु डॉ. व्ही. एन. मगरे, कृष्णा महिला औद्योगिक सहकारी संस्थेच्या संस्थापिका सौ. उत्तरा भोसले, सौ. सुवर्णाताई विखे-पाटील, सौ. मोनिका सावंत- इनामदार, ध्रुव विखे-पाटील, कुलसचिव डॉ. रवींद्र लावरे आदी मान्यवर होते.

या सोहळ्यात पद्मविभूषण प्रा. मनमोहन शर्मा यांच्या हस्ते डॉ. सुरेश भोसले यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. यावेळी सत्काराला उत्तर देताना डॉ. भोसले यांनी आपल्या भाषणात कृष्णा आणि प्रवरा या दोन्ही संस्थांच्या जडणघडणीच्या इतिहासाचा आढावा घेतला. ते म्हणाले, प्रवरा आणि कृष्णा या दोन्ही संस्थांच्या वाटचालीमागे समान वारसा आणि समान मूल्ये आहेत. ग्रामीण भागात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत सहकारी साखर कारखाने उभारण्याचे धाडस आमच्या पूर्वजांनी केले. त्यांच्या दूरदृष्टीमुळे आणि धैर्य, चिकाटी व संघर्षामुळे ग्रामीण महाराष्ट्राच्या सामाजिक व आर्थिक परिवर्तनाला दिशा मिळाली. त्यांनी निर्माण केलेला वारसा, मूल्ये आणि सामाजिक बांधिलकी पुढे नेणे हीच आमच्यासह पुढील पिढ्यांची जबाबदारी आहे. प्रवरा विद्यापीठाकडून दिलेल्या या पुरस्काराबद्दल मी आपल्या सर्वांचा कृतज्ञ आहे.
पद्मविभूषण प्रा. मनमोहन शर्मा यांनी डॉ. सुरेश भोसले यांचा सन्मान केल्याबद्दल प्रवरा संस्थेचे अभिनंदन केले. एका वैद्यकीय संस्थेने दुसऱ्या वैद्यकीय संस्थेतील ज्येष्ठ व्यक्तिमत्त्वाचा सन्मान करणे ही विशेष बाब असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच वैद्यकीय शिक्षण आणि संशोधनात कृष्णा व प्रवरा संस्थांनी परस्पर सहकार्य वाढवावे, तसेच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर ठसा उमटविणारे संशोधन व विशेष कौशल्याचे क्षेत्र विकसित करावे, असे आवाहन केले.
अध्यक्षस्थानावरुन बोलताना प्रवरा विद्यापीठाचे कुलपती डॉ. राजेंद्र विखे-पाटील यांनी डॉ. सुरेश भोसले यांचे अभिनंदन करुन, संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेतला. गेल्या शैक्षणिक वर्षात प्रवरा विद्यापीठाने विविध क्षेत्रांत विस्तार केला असून, मल्टीऑर्गन ट्रान्सप्लांट सेंटरची स्थापना केल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी संस्थेच्या कॉलेज ऑफ फार्मास्युटीकल सायन्सेसच्या नव्या इमारतीचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच दीर्घकाळ सेवा बजावलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सन्मान व विद्यार्थ्यांना विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. कुलगुरू डॉ. व्ही. एन. मगरे यांनी स्वागत व प्रास्ताविक कले. प्रा. संजीव कुलकर्णी यांनी मानपत्राचे वाचन केले. कुलसचिव डॉ. रवींद्र लावरे यांनी आभार मानले.

या सोहळ्याला कृष्णा विश्व विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. एम. व्ही. घोरपडे, उपकुलसचिव एस. ए. माशाळकर, संशोधन संचालक (नि. ब्रिगेडियर) डॉ. हिमाश्री, डॉ. डी. के. अगरवाल, आंतरराष्ट्रीय व्यवहार विभागाच्या उपसंचालिका अर्चना कौलगेकर, कृष्णा फिजिओथेरपी विभागाचे अधिष्ठाता डॉ. जी. वरदराजुलु, फार्मसी विभागाचे अधिष्ठाता डॉ. एन. आर. जाधव, दंतविज्ञानचे अधिष्ठाता डॉ. शशिकिरण एन. डी., सहाय्यक कुलसचिव अस्मिता देशपांडे, यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे संचालक लिंबाजी पाटील, धोंडिराम जाधव, बाबासो शिंदे, बाजीराव निकम, संभाजीराव पाटील, बाजीराज थोरात, सुनील पाटील, अरविंद पाटील, छबन कांबळे, बाळासो जगताप, अविनाश खरात, दिपक जाधव आदी मान्यवरांसह प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



