कराड मर्चंन्ट बॅंक
कोल्हापूरताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रप्रशासनराज्यशैक्षणिकसांगलीसातारा

‘बापुजी’च्या जडणघडणीत शशिकांत पाटील यांचे योगदान मोलाचे : प्रा. डॉ. विनोद बाबर

‘प्रीतिसंगम’च्या माध्यमातून पत्रकारितेतही ठसा, सेवापूर्तीनिमित्त सपत्नीक सत्कार

कराड (हॅलो न्यूज) : – डॉ. बापुजी साळुंखे महाविद्यालयाच्या जडणघडणीच्या विविध टप्प्यांचे साक्षीदार राहून तब्बल ३७ वर्षे प्रामाणिकपणे सेवा बजावणारे वरिष्ठ लिपिक शशिकांत पाटील यांनी महाविद्यालयाला पंढरपूर आणि स्वतःला सावता माळी मानून कार्य केले. त्यांच्या या प्रदीर्घ, निष्ठावान आणि सर्वसमावेशक सेवेमुळे ते अजातशत्रू व्यक्तिमत्त्व ठरले असून, महाविद्यालयाच्या जडणघडणीत शशिकांत पाटील यांचे योगदान मोलाचे आहे. त्यामुळे महाविद्यालयाच्या इतिहासात त्यांच्या कार्याची नोंद निश्चितच घेतली जाईल, असे गौरवोद्गार प्रसिद्ध व्याख्याते प्रा. डॉ. विनोद बाबर यांनी काढले.

डॉ. बापुजी साळुंखे महाविद्यालय, कराड येथे शशिकांत पाटील यांच्या सेवापूर्तीनिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. डॉ. बाबर बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सतीश घाटगे होते. महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष तथा पत्रकार प्रमोद सुकरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रा. डॉ. बाबर यांनी, शशिकांत पाटील यांच्या महाविद्यालयीन सेवेसोबतच पत्रकारितेतील योगदानाचाही गौरव केला. दैनिक प्रीतिसंगमच्या माध्यमातून ग्रामीण भागातील युवकांना वार्ताहर म्हणून घडविण्याचे आणि त्यांना पत्रकारितेची संधी उपलब्ध करून देण्याचे काम पाटील यांनी केले. संपादक म्हणून त्यांनी पत्रकारिता क्षेत्रात योगदान देतानाच विविध सामाजिक प्रश्नांना वाचा फोडली. महाविद्यालयातील त्यांची कार्यपद्धती सहकार्याची आणि सर्वांना सोबत घेऊन जाणारी राहिली. त्यामुळे महाविद्यालयातील प्रत्येक घटकाला त्यांनी आणखी काही वर्षे आपल्यासोबत काम करावे, असे वाटणे हीच त्यांच्या कार्याची खरी पोहोचपावती असल्याचे बाबर यांनी नमूद केले.

प्राचार्य डॉ. सतीश घाडगे यांनी, शशिकांत पाटील यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत यशवंतराव चव्हाण स्मृती सदन येथे कार्यक्रम घेण्याची तयारी केली होती. मात्र, पाटील यांनी जाहीर कार्यक्रमास नकार दिल्याने महाविद्यालयातच कार्यक्रम घेण्याचे निश्चित करण्यात आले. डॉ. बापुजी साळुंखे यांच्या विचार व तत्त्वांनुसार जाहीर कार्यक्रम घेण्याचे ठरविल्याचे डॉ. घाटगे यांनी सांगितले.

शशिकांत पाटील यांच्या प्रदीर्घ सेवेकडे पाहताना डॉ. घाटगे म्हणाले की, त्यांच्या संपूर्ण कार्यकाळाचा आपण साक्षीदार आहोत. त्यांचे वडील व राष्ट्रीय स्तरावरील हॉलीबॉलपटू आकाराम पाटील यांची छबी शशिकांत पाटील यांच्या व्यक्तिमत्त्वात दिसून येते. महाविद्यालयाच्या शासकीय व प्रशासकीय कामकाजात त्यांचा मोलाचा वाटा राहिला आहे. अनेक प्रसंगी त्यांनी महाविद्यालयासाठी संकटमोचकाची भूमिका बजावली. स्वामी विवेकानंद स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या उभारणीतही त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी सांगितले.

पत्रकार प्रमोद सुकरे यांनी, शशिकांत पाटील यांच्या ३७ वर्षांच्या सेवाव्रताचा गौरव केला. नोकरीच्या सुरुवातीपासून निवृत्तीपर्यंत एकाच महाविद्यालयात सेवा करण्याची संधी मिळणे, हे त्यांच्या कार्यनिष्ठेचे आणि संस्थेशी असलेल्या बांधिलकीचे द्योतक असल्याचे त्यांनी सांगितले. कृष्णा-कोयनेच्या काठावर ‘प्रीतिसंगम’ या दैनिकाची मुहूर्तमेढ रोवून अनेक अडचणी, आव्हाने आणि स्थित्यंतरे पार करत पाटील यांनी ते २९ वर्षे अखंडितपणे चालविले. आज दैनिक प्रीतिसंगमने कराडचे मुखपत्र म्हणून ओळख निर्माण केली आहे. पत्रकारिता आणि महाविद्यालयीन सेवा या दोन्ही क्षेत्रांत त्यांनी दिलेले योगदान उल्लेखनीय आहे. डॉ. बापुजी साळुंखे यांच्या नावाची उंची वाढविण्याचे काम महाविद्यालयातील सर्व घटकांनी आजपर्यंत केले आहे, असेही सुकरे यांनी नमूद केले.

सत्काराला उत्तर देताना शशिकांत पाटील यांनी, महाविद्यालय उभारणीच्या सुरुवातीच्या काळातील आठवणींना उजाळा दिला. महाविद्यालयाची सुरुवात एका हायस्कूलमध्ये झाली होती. त्यानंतर नवीन जागेत महाविद्यालय स्थलांतरित करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. महाविद्यालयात येण्यासाठी सुरुवातीला साधा रस्ताही उपलब्ध नव्हता. एक-दोन खोल्यांपासून सुरू झालेल्या महाविद्यालयात प्रवेश प्रक्रिया सुरू झाली; मात्र इमारत बांधकामासाठी पुरातत्व विभागाची परवानगी मिळण्यात अडचणी निर्माण झाल्या. ही परवानगी मिळविण्यासाठी आपण दिल्लीपर्यंत पाठपुरावा केला आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या माध्यमातून परवानगी मिळवली, अशी आठवण पाटील यांनी सांगितली. महाविद्यालयाच्या जडणघडणीतील प्रत्येक टप्प्याचा आपण साक्षीदार असल्याचे सांगत त्यांनी ३७ वर्षांच्या सेवाकाळात सहकार्य करणारे सर्व प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, तसेच कुटुंबीयांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते शशिकांत पाटील यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. पत्रकार, तसेच काले ग्रामस्थांच्या वतीनेही त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात प्रा. ए.जी. थोरात, प्रा. एस.एम. पाटील, प्रा.डॉ. मारुती सूर्यवंशी, प्रा. सुरेश राजपूत, तसेच पत्रकार संभाजी थोरात, प्रमोद तोडकर आणि सचिन शिंदे यांनी मनोगत व्यक्त करून शशिकांत पाटील यांच्या कार्याचा गौरव केला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.प्रा. शीतल सालवाडगी यांनी केले. मान्यवरांचा परिचय प्रा.डॉ. सुभाष कांबळे यांनी करून दिला, तर आभार प्रा. ए.यू. पाटील यांनी मानले. कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थिनी, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, विविध क्षेत्रांतील मान्यवर, तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close