दैव बलवत्तर म्हणून आठ जण वाचले : ढेबेवाडी विभागात रात्र जागून काढली अन् सकाळी घर जमीनदोस्त

पाटण | सध्या पावसाळा सुरू असून साताऱ्यातील ढेबेवाडी भागातील दुर्गम असलेल्या पळशी गावात दैव बलवत्तर म्हणून 8 लोकांचे आणि 10 जनावरांचे प्राण वाचले आहेत. दगड-मातीत बांधलेले घर धोकादायक बनले होते. मात्र, यावेळी पाऊस कोसळत असल्याने जुन्या मातीच्या घराची स्थिती आणखीनच गंभीर झाली. रात्रभर छप्पर कुरकुरू लागल्याने जिवाच्या भीतीने कुटुंबाने अख्खी रात्र जागून काढली. दिवस उजाडताच त्या कुटुंबातील एकाने पोलिस पाटलांचे घर गाठून सर्व प्रकार त्यांच्या कानावर घातला. क्षणाचाही विलंब न लावता पोलिस पाटलांनी घरातून माणसे आणि जनावरे बाहेर काढली अन् अवघ्या काही मिनिटांतच मोठा आवाज करत घर जमीनदोस्त झाले. सकाळ- सकाळी सातच्या सुमारास पडलेल्या या घटनेने संबंधित कुटुंबीयांसह गावकऱ्यांच्याही काळजाचा ठोकाच चुकला. पाटण तालुक्यातील पळशी गावातील वसंत भैरू लोखंडे यांच्या कुटुंबियाबाबत हा प्रकार घडला आहे.
दुर्गम डोंगराच्या कुशीत वसलेल्या पाळशीतील वसंत भैरू लोखंडे यांचे दगड- मातीत बांधलेले कौलारू छपराचे घर अलीकडे संततधार पावसाने भिंती भिजून खूपच धोकादायक बनले होते. मात्र, दुसरा पर्याय नसल्याने कुटुंबातील आठ जणांचे जनावरांसह तेथेच वास्तव्य होते. रात्री घर एका बाजूला थोडे कलल्यासारखे वाटल्याने लोखंडे कुटुंबीयांची काळजी वाढली. त्यात उप्परही आवाज करू लागल्याने जीव मुठीत घेऊन एकमेकांना आधार देत आठही जणांनी रात्र जागून काढली. आज दिवस उजाडताच वसंत लोखंडे यांनी पोलिस पाटील प्रकाश लोखंडे यांचे घर गाठले आणि सर्व प्रकार त्यांच्या कानावर घातला. प्रसंगावधान राखून क्षणाचाही विलंब न लावता प्रकाश व त्यांचे वडील काशिनाथ लोखंडे तिकडे धावले. घर कोणत्याही क्षणी कोसळेल, अशी चिन्हे असल्याने वेळ न दवडता तत्काळ त्यांनी घरातील आठ जणांना आधार देत बाहेर काढले.
त्यामध्ये नव्वद व पंच्याहत्तर वयाच्या दोन आजीही होत्या. घरात बांधलेली दहा जनावरे तसेच कोंबड्याही त्यांनी बाहेर सोडून दिल्या. घर रिकामे करून काही मिनिटेच होतात न होतात तोच मोठा आवाज करत ते जमीनदोस्त झाले आणि तेथे उपस्थित सर्वांच्याच काळजाचे पाणी झाले. या घटनेत लोखंडे कुटुंबीय आणि त्यांची जनावरे बचावली. मात्र, घरातील धान्य, भांडी, कपडे, प्रापंचिक साहित्य ढिगान्याखाली सापडून मोठे नुकसान झाले. अंगावरील कपड्यानिशी सर्वांनी पोलिस पाटील प्रकाश लोखंडे यांच्या घरी आश्रय घेतला आहे. वसंत लोखंडे यांची परिस्थिती हलाखीची आहे. दोन वर्षांपूर्वी त्यांना मंजूर झालेले घरकुलाचे बांधकामही परिस्थितीमुळे अजून त्यांना पूर्ण करता आलेले नाही.