भरदुपारी घरात झोपलेल्या युवतीचा 9 जणांकडून अपहरणाचा प्रयत्न : कराड तालुक्यातील प्रकार

कराड । भरदुपारी घरात झोपलेल्या युवतीच्या अपहरणाचा प्रयत्न झाला. यावेळी प्रसंगावधान राखत ग्रामस्थांनी अपहरण करणाऱ्यांचा पाठलाग करुन एकाला पकडले. तर त्याचे साथीदार कार तसेच दुचाकीवरुन पसार झाले. कराड दक्षिण विभागातील एका गावात ही घटना घडली. याप्रकरणी नऊजणांवर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुनील नारायण पवार (रा. ईटकरे, ता. वाळवा, जि. सांगली), माणिक निवृत्ती लाड (रा. येलूर, ता. वाळवा, जि. सांगली) यांच्यासह अन्य सातजणांचा गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये समावेश आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कराड दक्षिण विभागातील एका गावातील युवती 2016 साली तीच्या वाळवा तालुक्यातील नातेवाईकांकडे शिक्षणासाठी राहत होती. त्यावेळी सुनील पवार याचे तीच्या घरी येणे-जाणे होते. त्यातुनच सुनील पवार याने त्या युवतीला लग्नाची मागणी घालून मला तु आवडतेस, असे सांगीतले होते. मात्र, ही बाब समजल्यानंतर युवतीच्या पालकांनी तीला गावी आणले. त्यानंतर सुनील पवार याने वारंवार युवतीशी संपर्क साधला. मात्र, लग्नाला माझा व माझ्या आई-वडिलांचा विरोध असून हे लग्न होऊ शकत नाही, असे युवतीने त्याला सांगितले. एप्रिल 2023 नंतर युवतीने सुनीलशी असलेला संपर्क तोडला.
दरम्यान, शनिवारी दुपारी जेवण केल्यानंतर पिडीत युवती त्यांच्या घराशेजारी राहणाऱ्या आजीच्या घरी झोपण्यासाठी गेली होती. त्यावेळी अचानक सात ते आठजण घरात घुसले. त्यांनी त्या युवतीला जबरदस्तीने ओढत घराबाहेर आणले. कारमध्ये घालून त्यांनी तीचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी सुनील पवार याला युवतीने ओळखले. तीने आरडाओरडा केल्यानंतर परिसरातील ग्रामस्थ त्याठिकाणी जमले. त्यांनी पाठलाग करुन युवतीची सुटका केली. तसेच माणिक लाड या संशयीताला जागीच पकडले. मात्र, इतर सात ते आठजण कारमधून तसेच दुचाकीवरुन पळून गेले. याबाबत पिडीत युवतीने दिलेल्या फिर्यादीवरुन नऊजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक अर्चना शिंदे तपास करीत आहेत.