सातारा पोलिसांची कारवाई : दोन कोटीचा मुद्देमाल घेवून जाणाऱ्या एकाला अटक, एक फरार
शिवथर येथे बनावट गोवा निर्मित दारू जप्त

सातारा :- शिवथर (ता.जि. सातारा) गावाच्या हद्दीत धडक कारवाई करत सातारा तालुका पोलिसांनी बनावट गोवा निर्मित दारू जप्त केली आहे. या कारवाईत दारूसह कंटेनर आणि मोबाईल असा एकूण १ कोटी ९८ लाख ४८ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी प्रेमकुमार जनकधारी सिंग (वय ५८, रा. पारशी रोड, रुतमाजी, कोसीपुरा, कोलकाता) याला अटक केली असून सुरेंद्र शर्मा (रा. दिल्ली) हा संशयित फरार आहे. त्याचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, शिवथर परिसरातून टाटा कंपनीच्या कंटेनरमधून मोठ्या प्रमाणावर बनावट गोवा दारूची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून शनिवारी (दि. १९) सायंकाळी सुमारे ७ वाजता सातारा-फलटण मार्गावरील शिवथर येथे आरजे-१४ जीआर-०५३९ क्रमांकाचा कंटेनर अडवला.
वाहनाची पंचांसमक्ष तपासणी केली असता १ कोटी ५६ लाख २८ हजार ८०० रुपयांची बनावट गोवा दारू, सुमारे ४२ लाख रुपयांचा कंटेनर तसेच २० हजार रुपयांचा मोबाईल असा एकूण १ कोटी ९८ लाख ४८ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणाचा पुढील तपास सातारा तालुका पोलिसांकडून सुरू असून, दारूचा साठा नेमका कोठून आणण्यात आला होता आणि तो कुठे पोहोचविण्यात येणार होता, याचा तपास केला जात आहे. सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा तालुका पोलीस ठाण्याच्या पथकाने केली आहे.



