Hello News 2026 Ganpati Arati Book
ईतरताज्या बातम्यापर्यटनपश्चिम महाराष्ट्रब्रेकिंगराजकियराज्यसातारा

कराडच्या मेहेरबानांची काश्मीर सहलीत ढुशुम…ढुशुम…ढिशुम

विशाल पाटील (हॅलो न्यूज)- कराड पालिकेच्या मेहेरबानांची काश्मीरच्या गुलाबी थंडीत चांगलीच ट्रीप झाली. बर्फाचा थंडागार वर्षाव, रंगबेरंगी फुले, पहलगाम, गुरमर्ग चा दाैरा अन् वेगवेगळे पेये मग काय सगळं कसं एकदम झिंग…झिंग…झिंगाटच की राव. कसली जबरदस्त ट्रीप त्या ट्रीपला सोशल मिडियावर हवा करण्यासाठी हिंदी गाण्याच्या तालावरील रिल्स जणू काही आपण रिल्सस्टार. सगळं एकदम फिल्मी स्टाईल सुरू होत. आता फिल्मी सगळं म्हटल्यावर आता आपल्याला हिरोगिरी केल्याशिवाय राहणार हाय व्हय. मग काय रं भावा आपल्याला कोण- कोण नडलं यांचा पोटात एवढं दिवस राहिलेला इषय निघल्याशिवाय राहणार थोडीचं. मग जसा- जसा पॅक पोटात जात होता, तसा तसा पोटात साठलेलं, अोठावर येत होतं. मग काय सुरू झाली ढुशुम…ढुशुम…ढुशुम…फाईट अन् सगळं एकदम वातावरण टाईट.

तर कराडकरांनो इषय कसा हाय, काही दिवसापूर्वीच आपल्या पालिकेच्या निवडणुका झाल्या. या निवडणुकात जसं आपल्या राज्यात फोडाफोडीच, उड्या मारामारीचं राजकारण झालं. तसं आपल्या कराडच्या पालिका निवडणुकीत झालं, सगळ्यांनी पाहिलं. पण आपल्याला उघड घडलं तेवढं दिसलं. पण आतन जे काय घडलं ते नाही दिसलं. आतन घडत होत तेव्हा रिकामं पोट असल्याने ते पचवून ठेवलं होत. कारण निवडणूक सुरू होती, नेत्यांचा आदेश व्हता, चुकीचं काय करायचं नाही. कराडच्या मतदाराने आपल्याला वाईट म्हटलं नाय पाहिजे, मत मिळणार नायतं अस वागायचं नाय. आपण कसं पण असूदे, मात्र आपण सोज्वळ दाखावयचं. कराडमध्ये आपल्या एवढं कोणी शांत जणू नाही. आपल्याला शांततेचं नोबेल दिलं पाहिजे अस वागायचं, असा आदेश निवडणुकीत व्हता. आता झाल्या निवडणुका पाच वर्ष कोण मेहेरबान पदावरन आपल्याला हलवू शकत नाय. तेव्हा पोटात साठलेलं बाहेर काढण्याची येळ आली असून अडीच, तीन हजार किलोमीटरवर काय घडलं, कोणाला काय समजणार न्हाय. असा इचार झाला पक्का अन् मग नुसतं ढिशुम…ढिशुम..ढिशुम सुरू झाली.

आता सविस्तर इषय समजून घेवूया नक्की काय झालं. एक नवखा नगरसेवक, दुसरा नवख्या नगरसेविकेचा पती अन् जेष्ठ पहिल्या फळीतील नव्याने समावेश झालेल्या पदाधिकारी आणि त्यांच्या माणसांची फाईट. ती कशी काय झाली. याविषयी कराडकरांच्यात चांगलीच चर्चा सुरू आहे. कराडच्या लोकशाहीचे धिंडवडे काश्मीरात निघताना जनतेची शक्ती ही कमी पडली ना राव. काय सागायचं सर्वपक्षीय ट्रीप, त्यात हा राडा जवळपास अर्धा तास सुरू व्हता ना. सुरूवात कोणी केली, कशी केली यावर मतमंतारे सुरू आहेत. मात्र, राडा झाला यावर आता काश्मीरच्या त्या हाॅटेलातच नव्हं तर कराडकरांच्यातही एकमत झालं आहे.

विधान परिषदेचं मतदान झालं अन् त्याचदिवशी रात्री भरून ठेवलेल्या बॅगा उचलल्या आणि मेहेरबान थेट काश्मीरला गेले की. कराडकरांना काही थांगपत्ता नाही ना. पण सोशल मिडियावर फेमस व्हायची संधी, कोणी कधी सोडली हाय का सांगा बर. इम्रान हश्मीच्या मर्डर चित्रपटातील गाण्याची चांगलीच भुरळ पहायला मिळाली. अमीर, शाहरूख खानच्या गाण्यांनी नुसता धुमाकूळ घातला. मग ”ऐ हसी वादिया, ऐ खुला आसमान” गाण्यावर रात्रीची मैफील बसली. रात्रीची मैफिल बसली ती काय जणू स्वर्गातच बसलूया अस वाटू लागलं पण तिथं पोटात साठलेलं ढवळू लागलं.

पोटात साठलेलं ढवळू लागल्यानं काहीना कसंतरी होवू लागलं, मग ठरलं आपण आपलं आपल्या रूमवर जावूया. रूमवर गेल्यावर पोटातलं ढवळलेलं खवळू लागलं. खवळंलेलं आता बाहेर काढल्याशिवाय काय शांत होणार न्हाय, मग ठरलं चला पुन्हा मैफिलीच्या ठिकाणी अन् सुरू झाला ना. लोकशाहीच्या स्तंभातील पहिला म्हणजेच लोकप्रतिनिधीचा राडा. आता हा लोकशाहीला काळीमा फासणारा प्रकार कुणी थांबायचा म्हणून जनतेची शक्ती पुढे आली. पण काय सागायचं जनतेची शक्तीही अपुरी पडू लागली अन् झाली की ढुशुम…ढुशुम फाईट. यावेळी तिथं असणारी काही मेहेरबांनानी मज्जा घेतली, काहींनी सहभाग घेतला. काहींनी सोडवा सोडवीचा प्रयत्न केला पण अर्धा तास वातावरण एकदम टाईट ठेवत फाईटच फाईट की राव.

ए थांब तुला दाखवतो, दुसरा मी पण दाखवतो तर तिसरा म्हणे मी पण दाखवतो. नुसत्या दाखवतोनं वातावरण गरम झाल… एकदा का गरम वातावरण झाल्यानं, थंडीतल्या गर्मीत कुणाला राहवतय तवा. मग आपली पावर दाखवण्याची स्पर्धा सुरू झाली, कराडच्या मेहेरबांनानी वाखानातून सुरू झालेला वाद, बारा डबरीत जाळ अन् धूर काढू लागला. मंडईत नुसता पालिकेच्या मैदानात नुसता राडा- राडा, पाण्याच्या टाकीकडून पुढ सरकत सरकत दत्त चाैकात आला ना राव. आता हे सगळं मी तुम्हाला कराड शहरात घेवून आलो बघा, पण हे घडत होत कुठं तर काश्मीरात ते पण गुलाबी थंडीत. कराडकरांच काश्मीरात तापमान वाढलेलं होत. सगळे पर्यटक थंडीत अन् कराडकर नुसते तापलेल्या तापमानात तिथं एसी पण काम करत नव्हता एवढा राडा. आता या राड्यात कुणाला फाईट, कुणाची टाईट हे मात्र आपण गुपित ठेवूया. कारण आताच्या मेहेरबांनाना दंड थोपटण्या पलीकड काही दिसत नसलं. तरी आपल कराड सुसंस्कृत, स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या विचाराचं आहे. एवढचं तेव्हा आता जाणार का सगळे जण एकत्रित ट्रीपला … काश्मीरला.

भाऊंना अगोदरच कानकुन… अन् दाैऱ्यापासन लांब
काश्मीर दाैरा त्यालाही स्पाॅन्सर म्हटल्यावर सगळ्यांनी भरल्या की बॅगा.  पण कस हाय आपल्यात लय भाऊ असे हायती. त्यांना कुठं, कधी जायचं यांची चांगल माहीती हाय. त्यामुळं राजकारणात त्यांनी योग्यवेळी टायमिंग साधत उडी घेतली. अन् काश्मीर दाैऱ्याला कोण- कोण गडी हाय यांचा इचार केला. अन् दाैऱ्यापासनं लांबच राहिले ना आपले भाऊ.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close