कार्वेत पहाटेचा थरार : चोरट्याला ग्रामस्थांनी पकडले, दोघे फरार

कराड :- कराड तालुक्यातील कार्वे परिसरात चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला असून, घरफोडी, मंगळसूत्र चोरी तसेच दिवसा दवाखान्यातून रोकड लंपास करण्याच्या घटनांनी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, शनिवारी पहाटे चोरी करून पळून जाणाऱ्या एका चोरट्याला ग्रामस्थांनी सतर्कतेमुळे पाठलाग करून पकडले, तर त्याचे दोन साथीदार फरार झाले.

याबाबत अधिक माहिती अशी की, शनिवारी पहाटेच्या सुमारास कार्वे येथील रवींद्र किसन थोरात यांच्या घरात चोरट्यांनी प्रवेश करून तिजोरीतील सुमारे तीन ते साडेतीन तोळे सोन्याचे दागिने लंपास केले. चोरी लक्षात येताच थोरात यांनी इतर नागरिकांच्या मदतीने चोरट्यांचा पाठलाग सुरू केला. चोर नदीच्या दिशेने पळत कोरेगावच्या रस्त्याने गेल्यानंतर पुढील वस्तीवरील नागरिकांना फोनवरून माहिती देण्यात आली. नागरिकांनी तत्परता दाखवत चोरट्याचा पाठलाग करून त्याला पकडले. संतप्त नागरिकांनी त्याला चोप देत कराड ग्रामीण पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संबंधित चोरट्याला ताब्यात घेतले.
दरम्यान, ताब्यात घेतलेल्या चोरट्याने मागील काही दिवसांत कार्वे परिसरात केलेल्या चोरीच्या घटनांची कबुली दिली. चार दिवसांपूर्वी एका दवाखान्यात दिवसा प्रवेश करून रोकड चोरी करण्यात आली होती. तसेच मागील आठवड्यात रात्रीच्या सुमारास एका घरात घुसून महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून चोरटे पसार झाले होते. याच परिसरातील आणखी एका घरातून तीन ते चार हजार रुपयांची रोकड चोरीला गेल्याची माहिती समोर आली आहे. या घटनांमध्ये आणखी दोन साथीदारांचा सहभाग असल्याचे प्राथमिक तपासात समोर येत असून ते फरार आहेत. या घटनेचा अधिक तपास पोलिसांकडून केला जात आहे.



