kota acadamy karad
ताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रब्रेकिंगराजकियराज्यशैक्षणिकसातारा

कराडला भर पावसात काँग्रेस कार्यकर्ते आणि पोलिसांच्यात झटापट : NEET पेपर घोटाळ्याविरोधात तीव्र आंदोलन

कराड :- देशभर गाजत असलेल्या NEET पेपर घोटाळ्याच्या निषेधार्थ आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या तात्काळ राजीनाम्याच्या मागणीसाठी कराड शहर काँग्रेसच्या वतीने आज दत्त चौक येथे भर पावसात जोरदार आंदोलन करण्यात आले. “धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या”, “मोदी सरकारचा निषेध असो”, “विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो” अशा जोरदार घोषणांनी परिसर दणाणून गेला. आंदोलनादरम्यान काही काळ काँग्रेस कार्यकर्त्यांनी रास्ता रोको करत केंद्र सरकारच्या धोरणांचा निषेध नोंदविला.यावेळी काॅग्रेस कार्यकर्ते आणि पोलिसांच्यात काही काळ झटापटही झाली.

यावेळी काँग्रेसचे सातारा जिल्हाध्यक्ष नामदेवराव पाटील म्हणाले, “देशातील विद्यार्थी आणि युवकांनी शांततेच्या मार्गाने दिल्लीत मोर्चा काढला असताना त्यांच्यावर अमानुष लाठीमार करण्यात आला. या घटनेच्या निषेधार्थ लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिल्लीतील निवासस्थानासमोर आंदोलन केले असता त्यांच्यासह काँग्रेसच्या खासदारांना दिल्ली पोलिसांनी अटक केली. ही घटना लोकशाहीसाठी अत्यंत धोकादायक असून केंद्र सरकारची हुकूमशाही वृत्ती देशाला अराजकतेकडे नेत आहे. नरेंद्र मोदी सरकार सत्तेवरून पायउतार होत नाही तोपर्यंत विद्यार्थी, युवक आणि सर्वसामान्यांवरील अन्याय थांबणार नाही. त्यामुळे केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांविरोधात काँग्रेस पक्ष न्याय आणि हक्कासाठी सातत्याने रस्त्यावर उतरून संघर्ष करत राहील.”

यावेळी जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष राहुल पवार यांनीही केंद्र सरकारवर टीका करत म्हटले की, “NEET पेपर घोटाळ्यामुळे लाखो विद्यार्थ्यांच्या कष्टांवर पाणी फिरले आहे. विद्यार्थ्यांचे भविष्य उद्ध्वस्त करणाऱ्या या घोटाळ्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा. देशातील युवकांच्या भविष्याशी तडजोड करणाऱ्या सरकारविरोधात युवक काँग्रेस अधिक तीव्र आंदोलन उभारेल.”

या आंदोलनात जिल्हाध्यक्ष नामदेवराव पाटील, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष राहुल पवार, पंचायत समिती सदस्य संग्राम पवार, रवी बडेकर, कराड उत्तर काँग्रेस अध्यक्ष बाबुराव पवार, युवक काँग्रेस प्रदेश सरचिटणीस अमित जाधव, प्रदेश प्रतिनिधी झाकीर पठाण, एससी काँग्रेस सेल जिल्हाध्यक्ष संजय तडाखे, प्रवीण वेताळ, दिग्विजय सूर्यवंशी, देवदास माने, चैतन्य पाटील, समीर इनामदार, वसीम इनामदार, दिग्विजय जमाले, महेश पवार, तुषार लोंढे, शानूर देसाई, अजित पवार, अमित जाधव, रविराज पाटील, संग्राम काळभोर, मुकुंद पाटील, विक्रम पाटील, प्रतिक निकम, नितीन पाटील, मुबीन बागवान, उमर सय्यद, गणेश सूर्यवंशी, प्रदीप जाधव, सुरेश भोसले, युवराज कुंभार, अक्षय सुर्वे, अमोल जाधव, शाहरुख मुल्ला, सचिन पाटील यांच्यासह काँग्रेस, युवक काँग्रेस, अल्पसंख्यांक काँग्रेस सेल, एससी काँग्रेस सेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले.

विद्यार्थिनीच्या फलकाने वेधले लक्ष
आंदोलन सुरू असताना रस्त्यावरून जाणाऱ्या काही महिला आणि विद्यार्थ्यांनी स्वयंस्फूर्तीने आंदोलनात सहभाग घेतला. यावेळी एका विद्यार्थिनीने “आमचे भविष्य सुरक्षित करा” असा फलक हातात घेत आंदोलनात सहभाग नोंदविला. तिच्या या फलकाने उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेतले आणि विद्यार्थ्यांच्या मनातील संताप व असुरक्षिततेची भावना अधोरेखित झाली.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close