कोयना धरणातून कर्नाटकला 1 TMC पाणी : पाण्याचा विसर्ग वाढवला

पाटण | कोयना धरण पायथा विद्युतगृहातील दोन्ही युनिट सुरू असून, वीजनिर्मिती करून सिंचनासाठी नदीपात्रामध्ये 2100 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. मात्र, कर्नाटक राज्याने पिण्यासाठी तीन टीएमसी पाण्याची मागणी केल्याने पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला असून आता 4 हजार 200 विसर्ग सुरू केला असल्याची माहिती धरण व्यवस्थापनाने दिली आहे.
कोयना धरणातून कर्नाटक राज्याला एक टीएमसी पाणी देण्याबाबत आदेश मिळाल्यामुळे मंगळवारी रात्री आठ वाजता कोयना धरणाचे नदी विमोचकाद्वारे होणारा विसर्ग वाढवून दोन हजार 100 क्युसेक करण्यात आल्याची माहिती धरण व्यवस्थापनाने दिली आहे. नदी विमोचकामधून विसर्ग वाढविल्यामुळे पायथा वीजगृह व नदी विमोचकाद्वारे प्रत्येकी दोन हजार क्युसेक असा एकूण चार हजार २०० क्युसेक पाण्याचा विसर्ग होणार आहे.
दिनांक 26 एप्रिलपासून 500 क्युसेक पाण्याचा विसर्ग कर्नाटक राज्यासाठी पिण्याच्या पाण्यासाठी सुरू आहे. त्यामध्ये एक हजार 600 क्युसेक विसर्ग वाढविण्यासाठी धरण व्यवस्थापनाला आदेश दिले आहेत. त्यामुळे सध्याचा पाणी विसर्ग वाढविण्यात आला आहे.