आपली ओळख बिन कामाचा आमदार : मनोजदादा घोरपडे यांचा हल्लाबोल


कराड। हणबरवाडी, धनगरवाडी योजना आताच्या सरकारच्या काळात रखडली नसून गेली 25 वर्षे मुद्दाम रखडवली होती. सदरील योजना पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्न केले. परंतु ही योजना पूर्ण होऊ नये, यासाठी अनेकांनी खूप प्रयत्न केले. आता योजनेचा दुसरा टप्पा पूर्ण झाल्याने थोड्याच दिवसांमध्ये त्याची चाचणी सुद्धा होणार आहे. योजनेचे उदघाटनही आम्ही लवकरच करणार आहोत. तेव्हा आपण सहकार मंत्री असताना काय दिवे लावले, हे सगळे जनतेने पाहिले आहे. आता आपली ओळख बिन कामाचा आमदार अशी झाली असून अशा या बिन कामाच्या आमदाराला घरात बसवण्यासाठी आपण सर्वांनी ताकदीने कामाला लागावे, असा हल्लाबोल भाजपचे कराड उत्तरचे नेते मनोजदादा घोरपडे यांनी आमदार बाळासाहेब पाटील यांच्यावर केला.

कराड येथील शासकीय विश्रामगृहात मोदी@9 या कार्यक्रमांतर्गत कराड उत्तर मधील पदाधिकारी यांची बैठक खासदार अमर साबळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी रामकृष्ण वेताळ, महेशबाबा जाधव, भीमराव (काका) पाटील, सागर शिवदास, अंजली जाधव, चंद्रकांत मदने, सुरेश कुंभार, शंकरराव शेजवळ, विकास गायकवाड, महेंद्रकुमार डुबल, सुनिल शिंदे, प्रमोद गायकवाड, शेखर वडणे, दिपाली खोत, शहाजी मोहिते आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी खासदार अमर साबळे म्हणाले, मोदींनी आजपर्यंत जेवढ्या योजना आणल्या प्रत्येक घरामध्ये त्याचा लाभार्थी आहे. त्यांच्यापर्यंत पोहोचून आपल्याला केंद्र सरकार व राज्य सरकारने केलेल्या कामांची माहिती लोकांच्या पर्यंत पोहोचवून त्याची जनजागृती करायची आहे. एवढं काम केलं तरी या ठिकाणी बदल निश्चित होणार आहे. यासाठी लागेल तेवढी मदत आणि निधी देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.



