सातारा एलसीबी पोलिसांनी 20 किलो गांजा पकडला

सातारा | मुंजवडी (ता. फलटण) येथे गांजा हा अंमली पदार्थ विक्री करण्याकरीता आलेल्या इसमांना ताब्यात घेवून त्यांचेकडून 5 लाख रुपये किमतीचा 20 किलो गांजा व 1 लाख रुपये किमतीच्या मोटार सायकल असा एकूण 6 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखा, सातारा यांनी जप्त केला आहे. या प्रकरणात बाळू गणपत कदम (वय- 51, रा. कुरबाबी, ता. माळशिरस, जि. सोलापूर) व बाळासो रामचंद्र रणदिवे (वय 50, रा. मुंजवडी, ता. फलटण, जि. सातारा) असे ताब्यात घेतलेल्या आरोपींचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना त्यांचे विश्वसनीय बातमीदारामार्फत एक इसम युनिकॉन मोटार सायकलवरुन मुंजवडी (ता. फलटण) गावातील माध्यमिक शाळेजवळ अंमली पदार्थ गांजाची विक्री करण्याकरीता येणार आहे. त्याप्रमाणे त्यांनी सहायक पोलीस निरीक्षक रविंद्र भोरे, पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे यांना नमुद इसमास ताब्यात घेवून त्यांचेवर कारवाई करण्याचे आदेश दिले. नमुद पथकाने प्राप्त माहितीचे ठिकाणी सापळा लावून नमुद इसमास व खरेदी करण्याकरीता आलेल्या इसमास ताब्यात घेतले. त्या इसमांच्या कब्जात एकूण 5 लाख रुपये किमतीचा 20 किलो गांजा तसेच 1 लाख रुपये किमतीच्या दोन मोटार सायकल मिळून आल्याने त्यांचेविरुध्द फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे.
पोलीस अधीक्षक समीर शेख व अपर पोलीस अधीक्षक बापू बांगर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण देवकर, सहायक पोलीस निरीक्षक संतोष पवार, रविंद्र भोरे, पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे, अमित पाटील, पोलीस अंमलदार तानाजी माने, अतिश घाडगे, संजय शिर्के, विजय कांबळे, सावीर मुल्ला, सचिन साळुंखे, अमोल माने, शिवाजी भिसे, अमित सपकाळ, अर्जुन शिरतोडे, अमित माने, स्वप्नील कुंभार, विक्रम पिसाळ, स्वप्नील दौंड, वैभव सावंत, संभाजी साळुंखे यांनी सदरची कारवाई केली.