खासदार श्रीनिवास पाटील यांना अपात्र करण्याची मागणी
मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातल्या शरद पवार गटातील राज्यसभा आणि लोकसभेतील सदस्यांना अपात्र करण्याची मागणी अजित पवार गटाकडून करण्यात आली आहे. यामध्ये सातारचे खासदार श्रीनिवास पाटील आणि मोहम्मद फैजल यांचे सदस्यत्व रद्द करावे, असं म्हटलं आहे.
राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांची पक्ष आणि चिन्हाची लढाई सुरू आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार गटाकडून लोकसभेचे अध्यक्ष आणि राज्यसभेचे सभापती दोघांकडे एक याचिका दाखल केली असून यामध्ये शरद पवार यांच्या गटातील सदस्यांना अपात्र करा, अशी मुख्य मागणीसाठी या याचिकेत केली आहे.
शरद पवारांच्या गटाचे समर्थक राज्यसभेतील खासदार वंदना चव्हाण आणि फौजिया खान यांचंही सदस्यत्व रद्द करण्याची मागणी अजित पवार गटाने केली आहे. कालच शरद पवार गटाच्या खासदारांनी राज्यसभा सभापती जयदीप धनखड यांची भेट घेत खासदार प्रफुल पटेल यांच्यावर कारवाईची मागणी केली होती. या याचिकेतून पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार अमोल कोल्हे यांचे नाव मात्र वगळण्यात आले आहे.