ईतरताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रबिझनेसराज्यसांगलीसातारा

कृष्णा बँकेला उत्कृष्ट नागरी सहकारी बँक पुरस्कार जाहीर

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक्स असोसिएशनकडून घोषणा

कराड :- राज्यातील सहकारी बँकांची शिखर संस्था असलेल्या महाराष्ट्र राज्य सहकारी बँक्स असोसिएशनच्यावतीने, दरवर्षी राज्यातील विविध सहकारी बँकांच्या कार्यक्षमतेचा आढावा घेत खास पुरस्कार दिले जातात. सन २०२३-२४ सालचा ‘पद्मभूषण कै. वसंतराव पाटील उत्कृष्ट नागरी सहकारी बँक’ पुरस्कार रेठरे बुद्रुक (ता. कराड) येथील कृष्णा सहकारी बँकेला जाहीर करण्यात आला आहे.

सहकार क्षेत्रात सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सहकारी बँकांच्या कार्याला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक्स असोसिएशनच्यावतीने दरवर्षी सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या बँकांना पुरस्काराने गौरविण्यात येते. असोसिएशनने नुकत्याच घेतलेल्या उत्कृष्ट नागरी सहकारी बँकेच्या स्पर्धेत, पुणे विभागातून रु. ५०० कोटी ते रु. १००० कोटीपर्यंच्या ठेवी असलेल्या बँकांमधून, सन २०२३-२४ सालच्या पुरस्कारासाठी सर्वोत्कृष्ट कामगिरी नोंदविणारी बँक म्हणून कृष्णा सहकारी बँकेची निवड केली आहे. कृष्णा बँकेला प्रतिष्ठेचा समजला जाणारा ‘पद्मभूषण कै. वसंतराव पाटील उत्कृष्ट नागरी सहकारी बँक’ पुरस्कार जाहीर केला आहे.

कृष्णा सहकारी बँकेने चेअरमन आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या नेतृत्वाखाली आणि कृष्णा कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली बँकेचा मोठा विस्तार केला आहे. सामान्य माणसांसाठी कार्य आणि सभासद हिताचा कारभार या उद्दिष्टाने बँकेने वाटचाल सुरु ठेवली आहे. तसेच बँकेने सातत्याने नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करत, ग्राहकांना मोबाईल बँकींगसारख्या अत्याधुनिक सोयी उपलब्ध करुन देत ग्राहकहित जपले आहे. सातारा, सांगली, कोल्हापूर व पुणे अशा ४ जिल्ह्यात २२ शाखा व १ विस्तारीत कक्षाच्या माध्यमातून कार्यरत असलेल्या, कृष्णा सहकारी बँकेने ३१ मार्च २०२५ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात १२११ कोटी ७४ लाख रुपयांचा एकूण व्यवसाय केला आहे. ग्राहक सेवा, आर्थिक शिस्त, पारदर्शक कारभार आणि डिजिटल तंत्रज्ञानाचा योग्य वापर या चतु:सुत्रीचा अवलंब करत बँक आपल्या ग्राहकांना उत्तम सेवा देत आहे.

लवकरच होणाऱ्या एका शानदार सन्मान सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे. या पुरस्कारामुळे कृष्णा बँकेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, याबद्दल बँकेचे सर्व सभासद, संचालक मंडळ, ग्राहक, अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker