सातारा- सांगली विधान परिषदेत धैर्यशील कदम विरूध्द बाळासाहेब पाटील लढत

सातारा ः – भारतीय जनता पक्षाकडून सातारा सांगली विधान परिषदेसाठी माजी जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. धैर्यशील कदम उद्या सकाळी 10 वाजता पुसेसावळी येथून सांगलीकडे रवाना होणार आहे. दुपारी 1 वाजता ते आपला अर्ज सांगली येथे निवडणूक कार्यालयात दाखल करणार आहेत.
विधान परिषदेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर साताऱ्यातून धैर्यशील कदम याचे नांव आघाडीवर होते. तर सुनील काटकर, विक्रम पावसकर, शेखर गोरे यांची नावे चर्चेत होती. तर सांगली जिल्ह्यातून माजी आमदार पृथ्वीराज देशमुख आणि सम्राट महाडिक यांची नावे चर्चेत होती. यात धैर्यशील कदम यांच्या नावाला पक्षाने पसंती दिली आहे.
महाविकास आघाडीतून प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आणि माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या नावाची चर्चा होती. मात्र जयंत पाटील यांनी आपल्या विश्वासू सहकाऱ्याला उमेदवारी मिळवून देण्यात यश मिळवले आहे. सांगली जिल्ह्यातील बाळासाहेब पाटील यांना उमेदवारी मिळाली असून तेही अर्ज दाखल करणार आहेत.



