विंग मधील दुर्देवी घटना : इमारत बांधकामाचा पिलर कोसळून महिलेचा मृत्यू

कराड – कराड तालुक्यातील विंग येथे इमारत बांधकाम सुरू असताना उभारण्यात आलेला पिलर अंगावर कोसळून झालेल्या दुर्घटनेत एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. सुरेखा संतोष कणसे (वय- 40) असे मृत महिलेचे नाव आहे. सदरची घटनेतील मृत महिला सुरेखा कणसे या घरासमोर कुटुंबीयांसमवेत कपडे धूत अचानक इमारत उभारणीसाठी उभारलेला पिलर अंगावर कोसळला. त्यामध्ये गंभीर जखमी झाल्या होत्या, उपचारासाठी दवाखान्यात दाखल केल्यानंतर डाॅक्टरांनी मृत घोषित केले.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, सुरेखा कणसे या शनिवारी सकाळी घरासमोर कुटुंबीयांसमवेत कपडे धूत होत्या. धुतलेले कपडे इमारतीसाठी उभारण्यात आलेल्या दोन कच्च्या पिलरमधील तारेवर वाळत घालण्यात आले होते. शेवटची चादर धूत असताना अचानक पिलरचे कच्चे बांधकाम त्यांच्या अंगावर कोसळले. सुमारे दहा फूट उंचीचा पिलर अंगावर पडल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी तत्काळ धाव घेत बचावकार्य राबविले. जखमी अवस्थेतील सुरेखा कणसे यांना उपचारासाठी कराड येथील कृष्णा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
कराड येथील वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. सायंकाळी शोकाकूल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते संतोष कणसे यांच्या त्या पत्नी होत. त्यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी व परिवार आहे. विंग हॉटेल परिसरात त्यांचे स्कूल बॅग विक्रीचे दुकान आहे.



