कराडच्या प्रवेशाद्वारावर 150 किलो चांदीसह 40 लाखांची रोकड जप्त
अंदाजे साडेतीन कोटीचा मुद्देमाल सापडला

कराड :- कराड शहर वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी संशयावरून केलेल्या तपासणीत एका सोना-चांदी व्यापाऱ्याच्या ट्रॅव्हल्स वाहनातून सुमारे दीडशे किलो चांदी व तब्बल 40 लाख रुपये रोख रक्कम आढळून आली. अंदाजे साडेतीन कोटीचा मुद्देमाल सापडली आहे. या घटनेमुळे कराड शहरात एकच खळबळ उडाली असून विविध तर्कवितर्कांना उधाण आले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, कराड शहर वाहतूक शाखेचे कर्मचारी शहर परिसरात वाहतूक नियंत्रणाचे काम करत असताना एका ट्रॅव्हल्स वाहनाबाबत संशय आल्याने त्यांनी वाहनाची तपासणी केली. यावेळी वाहनामध्ये सोना-चांदी व्यापाऱ्याशी संबंधित सुमारे दीडशे किलो चांदी व मोठ्या प्रमाणात रोख रक्कम आढळून आली. घटनेची माहिती तात्काळ कराडचे उपविभागीय पोलीस अधिकारी (डीवायएसपी) राजश्री पाटील यांना देण्यात आली. त्यानंतर संबंधित वाहन व मिळालेला मुद्देमाल कराड शहर पोलीस ठाण्यात आणण्यात आला. रोख रक्कम व चांदीबाबतची कागदपत्रे, जीएसटी बिले तसेच इतर आवश्यक तपासणी करण्याची प्रक्रिया पोलिसांकडून सुरू करण्यात आली.
दरम्यान, एवढ्या मोठ्या प्रमाणात रोख रक्कम आढळून आल्याने आयकर विभागाच्या पथकालाही पाचारण करण्यात आले. संबंधित रक्कम व मुद्देमालाची खातरजमा करण्याचे काम सुरू होते. या कारवाईबाबत पोलिसांकडून अधिकृत माहिती मिळाल्यानंतरच पुढील चित्र स्पष्ट होणार आहे. मात्र, कराड शहरात झालेल्या या कारवाईची दिवसभर चर्चा सुरू होती.



