मलकापूरात अनैतिक संबंधातून मध्यरात्री खून! : फरार दोघांना पोलिसांनी साताऱ्यातून उचलले

कराड (हॅलो न्यूज) : मलकापूर शहरातील लाहोटी नगर परिसरात अनैतिक संबंधाच्या संशयातून एका व्यक्तीवर कोयत्याने हल्ला करून त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना रविवारी मध्यरात्री घडली. सुनील नाथा चव्हाण (वय-37, रा. चाफळ, ता. पाटण) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या घटनेने मलकापूर परिसरात खळबळ उडाली आहे.
या प्रकरणी सुरज चव्हाण (रा. चाफळ, ता. पाटण) आणि त्याचा मित्र अक्षय म्हेत्रे (रा. कोरेगाव) या दोघांवर संशय असून, घटनेनंतर दोघेही फरार झाले होते. मात्र, कराड पोलिसांच्या पथकाने तपासाची चक्रे वेगाने फिरवत दोन्ही संशयितांना सातारा येथून ताब्यात घेतले आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सुनील चव्हाण यांचे सुरज चव्हाण यांच्या आईसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय संशयितांना होता. याच संशयातून रविवारी मध्यरात्री लाहोटी नगर परिसरात सुनील चव्हाण यांच्यावर दोघांनी कोयत्याने हल्ला केल्याचे सांगण्यात येत आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सुनील चव्हाण यांचा मृत्यू झाला.
गोलमाल है भाई गोलमाल : चोरी झाली मात्र तक्रार नाही, कराड पालिकेच प्रशासन कोणाला वाचवतंय
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील, कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांच्यासह गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले होते. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून घटनेची माहिती घेतली. संशयित आरोपींकडून हल्ल्यातील कोयते तसेच एक चारचाकी गाडी ताब्यात घेतली आहे. अधिक तपास कराड शहर पोलिस करत आहेत.



