पाटण तालुक्यात मध्यरात्री चोरट्यांनी घर पेटवले, दुचाकी जळाली
मोरगिरी विभागातील धाडसी चोरीमुळे लोकांच्यात भीती

पाटण (हॅलो न्यूज) :- पाटण तालुक्यातील मोरगिरी भागातील माणगाव येथे बुधवारी मध्यरात्री चोरीच्या दोन घटनांनी खळबळ उडाली आहे. बंद घरात चोरी केल्यानंतर चोरट्यांनी घर पेटवून दिले. या आगीत मोटारसायकल, टीव्ही, सोफा सेट, मौल्यवान वस्तू आणि संसारोपयोगी साहित्याचे नुकसान झाले. चोरट्यांनी याच परिसरातील बंद असलेल्या आरओ पाण्याच्या प्लांटमधून पाच मोटारींसह साहित्य चोरून नेले आहे. एकूण 1 लाख 54 हजारांचे साहित्य चोरीला गेल्याची नोंद पाटण पोलिस ठाण्यात झाली आहे. या धाडसी चोरीमुळे लोकांच्यात भीतीचे वातावरण असल्याचे पहायला मिळत आहे. घटनास्थळी डीवायएसपी सुदाम पाचुरकर, पोलिस निरीक्षक निलेश तारू, पोलिस उपनिरीक्षक बिपीन चव्हाण यांनी घटनास्थळी भेट दिली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, माणगाव येथील अलका शिवाजी जानुगडे या एकट्याच घरात राहतात. त्यांचा मुलगा व सून मुंबई येथे असल्याने त्या रात्री झोपण्यासाठी शेजारील घरात जातात. याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी बंद घरात प्रवेश करून चोरी केली. त्यानंतर घराला आग लावल्याचे निदर्शनास आले. आगीत घरातील संसारोपयोगी साहित्य, मौल्यवान वस्तू, मोटारसायकल, टीव्ही, सोफा सेट आदी जळून मोठे नुकसान झाले. अलका जानुगडे यांच्या घरातील सोन्याच्या दागिन्यांसह 74 हजार रूपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला आहे. तर पाण्याच्या आरअो प्लंट मधील 80 हजारांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरला असल्याची नोंद पोलिस ठाण्यात झाली आहे.
दरम्यान, विलास रामचंद्र वरंडे (रा. वरंडेवाडी) यांचा पाण्याचा आरओ प्लांटही चोरट्यांनी लक्ष्य केला. सदरचा आरओ प्लांट सध्या बंद असून तेथे कोणीही राहत नव्हते. चोरट्यांनी प्लांटमधील साहित्य तसेच पाच मोटारी चोरून नेल्या. चोरीचे साहित्य चारचाकी वाहनातून नेण्यात आल्याचे दिसून येत असून, रात्री सुमारे एक वाजण्याच्या सुमारास या घटना घडल्या असल्याचे सांगण्यात येत आहे. एकाच रात्रीत घडलेल्या या घटनांमुळे माणगाव परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून तपास सुरू केला असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, चारचाकी वाहनांची हालचाल आणि अन्य पुराव्यांच्या आधारे चोरट्यांचा माग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.



