कराडजवळ गणपतीपुळेला जाणाऱ्या तीन मित्रांचा गाडीचा भीषण अपघात; 1 ठार, 2 जखमी
कराड तालुक्यातील वडोली भिकेश्वर गावाजवळ अपघात


मसूर – सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील एका कंपनीत काम करणारे तीन मित्र सुट्टीसाठी गणपतीपुळे येथे फिरण्यासाठी निघाले असताना त्यांच्या चारचाकी गाडीचा मध्यरात्री भीषण अपघात झाला. भरधाव वेगातील ही कार 2 ते 3 वेळा पलटी होऊन रस्त्यालगतच्या झाडीत जाऊन अडकली. हा अपघात कराड तालुक्यातील वडोली भिकेश्वर गावाजवळ घडला.
या अपघातात अोकांर खंडागळे (वय 23), सध्या राहणार पाटण तर मूळ रहिवासी बीड जिल्हा, यांचा जागीच मृत्यू झाला. प्रशिक धावणे (वय 28, मूळ चंद्रपूर जिल्हा) हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. तिसरा युवक किरकोळ जखमी झाला असून तो सातारा जिल्ह्यातील पडळ येथील रहिवासी आहे.
अपघाताची भीषणता इतकी मोठी होती की मध्यरात्रीच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. मसूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पुढील तपास सुरू केला आहे. वडोली गावचे पोलिस पाटील यांनी पोलिसांना माहिती देत स्थानिकांच्या मदतीने जखमींना उपचारासाठी कराडला हलवले आहे. याठिकाणी पोलिस पाटील राजू रामुगडे, एएसआय सुधाकर भोसले, पोलिस काॅन्स्टेबल श्री. कोळेकर यांनी घटनास्थळी धाव घेतली तर संजय काटे हेही उपजिल्हा रूग्णालय कराड येथे उपस्थित होते.



