सातारा- सांगली महायुतीत धुसफूस : शिवसेना, राष्ट्रवादीची बैठकीकडे पाठ
अवघ्या 10 मिनिटांत प्रदेशाध्यक्ष, चंद्रकांत बाहेर पडले


कराड- महायुतीत समन्वयक बैठकीला राष्ट्रवादी, शिवसेनेची मंत्री, आमदार तसेच पदाधिकाऱ्यांनी दांडी मारल्याचे पहायला मिळाले. सातारा जिल्हा परिषदेतील झालेल्या अध्यक्ष पदाच्या राड्यानंतर आता शिवसेना, राष्ट्रवादी भाजपाला विधान परिषद निवडणुकीत खिंडीत पकडत असल्याचे पहायला मिळत आहे. महायुतीत समन्वय साधला न गेल्यास भाजपाला विधान परिषदेत मोठी किंमत मोजावी लागणार हे आजच्या बैठकीतून समोर आले आहे. सदरची बैठकी अवघ्या 10 मिनिटांत आटोपती घेत प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, चंद्रकांत दादा पाटील तडकाफडकी बाहेर पडले. तर एकनाथ शिंदेचे आमदार महेश शिंदे मात्र बैठकीला हजर राहिल्याने आता राजकीय वातावरण आणखी तापणार हे मात्र नक्की.
महायुतीतील घटक पक्षाची कराड येथील हाॅटेल फर्न येथे समन्वय समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, भाजप जिल्हाध्यक्ष आ. अतुल भोसले, शिवसेना आ. महेश शिंदे, आ. मनोज घोरपडे, आ. गोपीचंद पडळकर, भाजपा किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष रामकृष्ण वेताळ, माथाडी नेते नरेंद्र पाटील, आ. सदाभाऊ खोत, सुनिल काटकर, सातारा जिल्हा परिषद अध्यक्षा प्रियाताई शिंदे, उपाध्यक्ष राजू भोसले यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महायुती समन्वय बैठकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 12 वर्षाच्या तपपूर्ती कामांची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी उपस्थित नाहीत. यावर शिवेंद्रराजेंनी सदरची समन्वय बैठक प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी बोलवली होती. अशी सारवासारव करत महायुतीत कुठली अडचण नसल्याचे म्हटले आहे.
शक्तीपीठ महामार्गाच काॅंग्रेस, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून भांडवल
सातारा- सांगली जिल्ह्यातून शक्तिपीठ महामार्ग जात असून त्याला विरोध करणाऱ्या काॅंग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी भांडवल करत असून चांगला प्रकल्प आडवायच काम करत असल्याची टीका बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी कराड येथे केली आहे. सातारा जिल्ह्यातील माण- खटाव तसेच सांगली जिल्ह्यातील अनेक गावातून हा शक्तीपीठ महामार्गाला काही शेतकऱ्यांनी समर्थनाचे पत्रही दिल्याचे मंत्री शिवेंद्रराजेंनी सांगितले.
उदयनराजेंचे दिलखुलास हासले
महायुती समन्वय बैठकीनंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत लाईट गेली असता, पत्रकारांनी शिवेंद्रराजेंना प्रश्न विचारत असल्याने लाईट घालवली का असा प्रश्न करताच, डीपी लोड आला असल्याचे म्हणाले. मात्र, यावेळी पाठीमागे उभे असलेले खासदार छ. उदयनराजे भोसले यांनी दिलखुलास हास्य केल्याचे पहायला मिळाले.



