KARAD स्मार्ट मीटरविरोधी मोर्चा संपन्न : संग्राम बाबा पवार यांच्या नेतृत्वाखाली वीज ग्राहकांचा जोरदार निषेध

कराड, प्रतिनिधी :- राज्यात सुरू असलेल्या स्मार्ट मीटर बसविण्याच्या प्रक्रियेविरोधात कराड येथे आज मोठ्या उत्साहात आणि घोषणाबाजीच्या वातावरणात भव्य निषेध मोर्चा संपन्न झाला. महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या विजयनगर कार्यालयाच्या कमानीपासून मुख्य अधिकाऱ्यांच्या कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. कराड पंचायत समिती सदस्य संग्राम बाबा पवार यांच्या नेतृत्वाखाली या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते.
या मोर्चामध्ये विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, शेतकरी, व्यापारी तसेच मोठ्या संख्येने वीज ग्राहक सहभागी झाले होते. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नामदेवराव पाटील, पंचायत समिती सदस्य सिद्धार्थ चव्हाण, प्रताप चव्हाण, रवींद्र बडेकर, सामाजिक कार्यकर्ते उमर सय्यद, सतीश पानुगडे, सुपण्याचे उपसरपंच अजित जाधव, कराड नगर परिषदेचे माजी नगरसेवक व भीमशक्तीचे आनंदराव लादे, शेतकरी संघटनेचे अनिल बापू घराळ, अमोल कणसे, महेश निकम, विद्याधर गायकवाड यांच्यासह कराड तालुक्यातील अनेक गावांचे सरपंच, उपसरपंच, कार्यकर्ते, शेतकरी आणि वीज ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्मार्ट मीटरमुळे वीज ग्राहकांवर आर्थिक भार वाढण्याची शक्यता, प्रीपेड वीज व्यवस्थेचा संभाव्य परिणाम तसेच बिलिंग प्रक्रियेबाबत निर्माण झालेल्या शंका आणि नाराजीच्या पार्श्वभूमीवर हा मोर्चा आयोजित करण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले. अनेक गावांच्या प्रतिनिधींनी तसेच विविध पक्ष, संस्था, संघटना आणि ग्रामस्थांनी आपली मनोगते व्यक्त करत स्मार्ट मीटर धोरणाला कडाडून विरोध दर्शविला.
यावेळी आंदोलनकर्त्यांनी स्मार्ट मीटर ग्राहकांना विचारल्याशिवाय बसवू नयेत, विनापरवाना बसवलेले स्मार्ट मीटर तात्काळ काढून जुने मीटर पुन्हा बसवावेत, तसेच स्मार्ट मीटरमुळे ग्राहकांना मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता असल्याचा आरोप केला. काही वक्त्यांनी उद्योगपतींना आर्थिक फायदा होण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतल्याचा आरोप करत हा कथित आर्थिक लुटीचा घाट त्वरित थांबवण्याची मागणी केली. मोर्चा दरम्यान वीज वितरण कंपनीचे कर्मचारी घरामध्ये पुरुष सदस्य नसताना ग्राहकांना न विचारता स्मार्ट मीटर बसवत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला. तसेच पूर्वी थकीत वीज बिलासाठी खांबावरून वीजपुरवठा खंडित केला जात होता, मात्र आता ग्राहकांना न विचारता थेट मीटर काढून घेतले जात असल्याने हा अन्यायकारक प्रकार असल्याची भावना आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली.
कराड पंचायत समितीमध्ये स्मार्ट मीटरविरोधात बहुमताने ठराव मंजूर झालेला असतानाही त्याकडे महावितरणकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप उपस्थित सदस्यांनी केला आणि पंचायत समितीच्या ठरावाची त्वरित दखल घेण्याची मागणी केली.
या आंदोलनाच्या शेवटी वीज ग्राहकांच्या विविध मागण्यांचे निवेदन संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले. तसेच स्मार्ट मीटरविरोधातील लढा अधिक तीव्र करण्यासाठी दिनांक २२ जून २०२६ रोजी कराड तालुक्यातील विविध पक्ष, संस्था, संघटना आणि शेतकरी यांच्या वतीने आणखी भव्य मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणा यावेळी करण्यात आली. वीज ग्राहकांनी आपल्या हक्कांसाठी एकजूट दाखवत मोठ्या संख्येने सहभाग नोंदविल्याने हा मोर्चा कराड तालुक्यात चर्चेचा विषय ठरला. उमर सय्यद, देवदास माने, अभिजित चवरे, आडवोकेट अनुप पाटील, दिपक पाटील, अमृत पाटील, इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते



