आरोग्यकोल्हापूरताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रपुणेब्रेकिंगमराठवाडामुंबईराजकियराज्यविदर्भसांगलीसातारा

‘कृष्णा’ देशातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठ – डॉ. अभिजात शेठ

कृष्णा विद्यापीठाचा दिक्षांत सोहळा उत्साहात संपन्न

कराड (हॅलो न्यूज): आरोग्य क्षेत्रातील प्रत्येकाने ज्ञान, चिकित्सक विचार, नैतिकता आणि जागतिक जबाबदारी या सर्व गुणांनी सज्ज असणे आवश्यक आहे. यासाठी भविष्यातील वैद्यकीय शिक्षण हे अधिकाधिक विद्यार्थीकेंद्रित, समाजाभिमुख व जागतिक दृष्टीकोन बाळगणारे असले पाहिजे, असे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाचे अध्यक्ष डॉ. अभिजात शेठ यांनी केले. कृष्णा विश्व विद्यापीठाच्या १४ व्या दिक्षांत सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलपती डॉ. सुरेश भोसले होते.

कृष्णा विद्यापीठाच्या प्रांगणात खास उभारलेल्या शामियानात हा दिक्षांत सोहळा उत्साहात संपन्न झाला. पोलिस बॅन्ड पथकाच्या मानवंदनेत प्रमुख पाहुण्यांना समारंभस्थळी नेण्यात आले. व्यासपीठावर विद्यापीठाचे प्रधान सल्लागार डॉ. वेदप्रकाश मिश्रा, डॉ. प्रवीण शिनगारे, कुलगुरू डॉ. नीलम मिश्रा, कार्यकारी मंडळाचे सदस्य श्री. विनायक भोसले, डॉ. हरी वासुदेवन, दिलीप पाटील, कार्यकारी संचालक पी. डी. जॉन, परीक्षा नियंत्रक डॉ. ज्योत्स्ना पाटील, कुलसचिव डॉ. एम. व्ही. घोरपडे आदी मान्यवर उपस्थित होते.

या सोहळ्यात विद्यापीठातील विविध अधिविभागातील ९७२ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. यामध्ये ३३ विद्यार्थ्यांना कुलपती डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली. तर प्रमुख मान्यवरांच्या हस्ते विविध अधिविभागात सर्वोत्कृष्ट ठरलेल्या २६ विद्यार्थ्यांना विशेष पदक देऊन सन्मानित करण्यात आले.

अध्यक्षस्थानावरुन बोलताना कुलपती डॉ. सुरेश भोसले म्हणाले, पारंपरिक शिक्षणपद्धती आता मागे पडत असून, समुदायाभिमुख शिक्षणपद्धतीला महत्त्व प्राप्त झाले आहे. कृष्णा विद्यापीठ संशोधनाभिमुख आणि नवोन्मेषाला चालना देणारी संस्था म्हणून विकसित होत आहे. नव्या वैज्ञानिक ज्ञाननिर्मितीवर आमचा भर आहे. यंदा विद्यापीठांतर्गत व बाह्य संशोधनात मोठी वाढ झाली असून, यावर्षी पेटंट्सची संख्याही वाढली आहे. आज वैद्यकीय शिक्षण अतिशय वेगाने बदलत असून, संपूर्ण शैक्षणिक व्यवस्था संक्रमणाच्या टप्प्यावर आहे. अशावेळी आपण एक असे मॉडेल विकसित करत आहोत, जे केवळ भारतातच नव्हे तर जगभरातील वैद्यकीय शिक्षणासाठी आदर्श ठरेल.

कुलगुरू डॉ. नीलम मिश्रा यांनी कृष्णा विश्व विद्यापीठाच्या गेल्या वर्षातील प्रगतीचा आढावा घेत, विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीचे कौतुक केले.

कार्यक्रमाला सौ. उत्तरा भोसले, माजी आमदार आनंदराव पाटील, मलकापूरचे नगराध्यक्ष तेजस सोनावले, उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, कराडचे नगरसेवक सुहास जगताप, जयवंत पाटील, शिवाजी पवार, कृष्णा कारखान्याचे नवनिर्वाचित संचालक जगदीश जगताप, बाबासो शिंदे, बी. एन. थोरात, आनंदा खबाले, सत्यजीत पाटील, लिंबाजी पाटील, जे. डी. मोरे, अविनाश खरात, सुनील पाटील, संभाजी पाटील, शिवाजीराव थोरात, कृष्णा विद्यापीठाच्या संशोधन संचालिका निवृत्त ब्रिगेडियर डॉ. जी. हिमाश्री, डॉ. डी. के. अगरवाल, कृष्णा वैद्यकीय विज्ञानच्या अधिष्ठाता डॉ. युगंतरा कदम, दंतविज्ञानचे अधिष्ठाता डॉ. शशिकिरण एन. डी., फिजिओथेरपीचे अधिष्ठाता डॉ. जी. वरदराजुलु, नर्सिंगच्या अधिष्ठाता डॉ. वैशाली मोहिते, सायन्स ॲन्ड टेक्नॉलॉजीचे अधिष्ठाता डॉ. गिरीश पठाडे, फार्मसीचे अधिष्ठाता डॉ. एन. आर. जाधव, डॉ. सुप्रिया पाटील, डॉ. रेणुका पवार, डॉ. टी. पूविष्णू देवी, डॉ. नूतन पोदार, डॉ. स्नेहल मसूरकर, डॉ. अक्षदा कोपर्डे, कृष्णा हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. विजय कणसे, डॉ. एस. आर. पाटील, डॉ. सत्यजीत पवार, डॉ. जयश्री ननावरे यांच्यासह विद्यापीठाच्या अभ्यास मंडळाचे सदस्य व विविध क्षेत्रातील मान्यवर, विद्यार्थी, पालक, प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

‘कृष्णा’ देशातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठ
कृष्णा विश्व विद्यापीठ हे सर्वोत्कृष्ट पायाभूत सुविधा असलेले देशातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठ आहे. तसेच या विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले हे एक उत्कृष्ट डॉक्टर आहेतच; पण त्यासोबतच प्रत्येक बाबींकडे बारकाईने लक्ष देणारे, परिपूर्णतेचा ध्यास घेतलेले एक दूरदर्शी नेते आहेत, असे गौरवोद्गार राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाचे अध्यक्ष डॉ. अभिजात शेठ यांनी आपल्या भाषणात काढले. याला उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात दाद दिली.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close