चांदोली धरण परिसरात मद्यधुंद पर्यटकांना प्रशासनाचा दणका :- ‘पार्ट्या’ ना ब्रेक


शिराळा – चांदोली धरण परिसरात पर्यटनाच्या नावाखाली सुरू असलेल्या मद्यधुंद हुल्लडबाजीवर अखेर प्रशासनाने कडक कारवाईचा बडगा उगारला आहे. वाढत्या प्रकारांमुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांच्या तक्रारीची गंभीर दखल घेत पोलिस तसेच धरण प्रशासनाने संयुक्त कारवाई करत धरण परिसरातील बेकायदा ‘दारू पार्ट्या ’ बंद पाडल्या. त्यामुळे परिसरात पुन्हा शांतता आणि सुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून चांदोली परिसरात काही पर्यटकांकडून मद्यप्राशन करून धिंगाणा घालणे, रात्री उशिरापर्यंत मोठ्या आवाजात डीजे वाजवणे, सार्वजनिक ठिकाणी गैरवर्तन करणे आणि महिलांना त्रास होईल असे प्रकार वाढले होते. त्यामुळे स्थानिक ग्रामस्थ, महिला आणि शेतकरी प्रचंड त्रस्त झाले होते.
या पार्श्वभूमीवर मणदूर ग्रामपंचायतीने कोकरूड पोलिस ठाणे तसेच जिल्हा पोलिस प्रशासनाकडे निवेदन देत तातडीने कारवाईची मागणी केली होती. या प्रश्नाला प्रसिद्धी मिळाल्यानंतर प्रशासनानेही त्वरित हालचाली सुरू केल्या. पोलिसांनी चांदोली धरण परिसरात विशेष बंदोबस्त तैनात करत संशयित पर्यटकांची तपासणी सुरू केली. मद्यधुंद अवस्थेत आढळलेल्या पर्यटकांना पोलिसांनी घटनास्थळावरून हटवले, तर काहींना समज देऊन सोडून देण्यात आले. धरण परिसरात होणाऱ्या रात्रीच्या पार्ट्यांवर पूर्णपणे निर्बंध घालण्यात आल्याने हुल्लडबाजांना मोठा आळा बसला आहे. यावेळी राहुल अतिग्रे पोलीस उपनिरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली स. पो.नि. सागर वरुटे,पोलिस हेडकॉन्स्टेबल अभिजीत कारंजकर, विनोद जाधव, रावजी लोहार,पोलिस कॉन्स्टेबल अभिजीत पवार, प्रशांत थोरवडे, आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
“चांदोली परिसरात काही पर्यटकांकडून सुरू असलेल्या गैरप्रकारांमुळे ग्रामस्थांमध्ये भीती आणि नाराजीचे वातावरण निर्माण झाले होते. महिलांना आणि कुटुंबांसह येणाऱ्या पर्यटकांनाही त्रास सहन करावा लागत होता. प्रशासनाने तातडीने कारवाई करून धरण परिसरातील हुल्लडबाजी थांबवली, ही स्वागतार्ह बाब आहे. चांदोलीचे पर्यटन टिकले पाहिजे; मात्र ते शिस्तबद्ध आणि सुरक्षित असणे तितकेच महत्त्वाचे आहे.”
सौ.शोभा माने सरपंच मणदूर ग्रामपंचायत
“चांदोली धरण परिसरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांकडून नियमित गस्त आणि विशेष बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मद्यप्राशन करून गोंधळ घालणाऱ्या तसेच महिलांना त्रास देणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई करण्यात येईल. पर्यटकांनी नियमांचे पालन करून सहकार्य करावे, अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल.”
– राहुल अतिग्रे पोलीस उपनिरीक्षक कोकरूड पोलिस ठाणे



